Collegium Recommends 3 Chief Justice : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी जुलैमध्ये नावांची शिफारस केली होती. या शिफारशीवर पुनर्विचार करून काही बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने कॉलेजियमला काही नावांबद्दल संवेदनशील माहिती दिली होती. त्यानंतर तीन नियुक्त्यांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
जुलै महिन्यात कॉलेजियमकडून सात नावांची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. त्यानंतर सरकारकडून काही नावांबद्दल संवेदनशील माहिती देण्यात आली. केंद्राच्या सूचनेनंतर मंगळवारी कॉलेजियमने पहिल्या शिफारशीवर पुनर्विचार करत काही बदल केले.
आधीच्या शिफारशीमध्ये काय होते?
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई सदस्य असलेल्या कॉलेजियमने शिफारशीमध्ये बदल केले आहेत. कॉलेजियमने न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या नावाची जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी शिफारस केली होती. न्यायमूर्ती जी.एस. संधवालिया यांच्या नावाची मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि न्यायमूर्ती ताशी राबस्तान यांच्या नावाची मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी शिफारस करण्यात आली होती.
कॉलेजियमकडून शिफारशीमध्ये काय बदल करण्यात आला?
केंद्र सरकारने काही नावांबद्दल संवेदनशील माहिती कॉलेजियमला दिली. त्यानंतर कॉलेजियमने शिफारशीवर पुनर्विचार केला आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी सूचवण्यात आलेल्या नावात बदल केले.
नव्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी न्यायमूर्ती राबस्तान यांचे नाव पाठवण्यात आले आहे. न्यायमूर्ती कैत यांच्या नावाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. तर न्यायमूर्ती संधवालिया यांच्या नावाची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी शिफारस करण्यात आली आहे.
कॉलेजियमने न्यायमूर्ती इंद्र प्रसन्न मुखर्जी यांना मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती करण्याची शिफारस केली आहे. न्यायमूर्ती मुखर्जी सध्या कोलकाता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आहेत.