नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णत्वास आली असून, निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांवर पुर्वसंध्येला पोहचले आहेत. मतदान केंद्रांवर पोहचल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. शहरातील काही मतदान केंद्रांवर पुरेशी व्यवस्था नसल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे केंद्राच्या ठिकाणी पंखेच नसल्याने मतदनाच्या दिवशी घाम फुटण्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी खासगीत बोलून दाखविली.
महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी शहरात ६३९ इमारतींमध्ये १४०७ मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी ७७४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या-त्या विभागातील निवडणूक कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळपासूनच मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले तर मतदान केंद्रावर साहित्य व मनुष्यबळ पोहोचविण्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली. कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहचल्यानंतर काही ठिकाणी केंद्रांची स्वच्छता करण्यात आली नसल्याची बाब समोर आल्याचेही समजते. अर्थात याविषयी कर्मचारी उघडपणे बोलणे टाळत असले तरी नाराजी मात्र त्यांनी खासगीत व्यक्त केली.
शहरातील काही मतदान केंद्रांची पहाणी केली असता मतदान केंद्राची खोली लहान असल्याने अस्वच्छता, खुर्च्यांचा अभाव तसेच पुरेसा प्रकाश नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात फक्त बल्बची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पंख्याचा तर प्रश्नच नाही. मंगळवारी होणाऱ्या शहरातील बहुतांश पालिका शाळांमध्ये अशाप्रकारची परिस्थिती आहे. खासगी शाळेत केंद्र असलेल्या कर्मचाऱ्यांची कोणतीही तक्रार नसली तरी मनपा शाळा आणि गावठाणातील शाळांमधील मतदान केंद्रांमुळे कर्मचारी नाराज असल्याचे बोलले जात आहे. मनपाच्या कोणत्याही वर्ग खोल्यांमध्ये पंखेच नसल्याने मतदान केंद्राची गैरसोय होणार असल्याचे बोलले जाते.