मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने नवीन मोबाईल घेतला. आठवडाभरानंतर त्या मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर तरुण आणि त्याचे कुटुंबीय घाबरले आहेत. तरुणाला आता कंपनीकडून नुकसानभरपाईही हवी आहे. जीव जाण्यासाठी ही महागडी वस्तू खरेदी केली नसल्याचं त्याने म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिवनीच्या गोपाळगंज गावात राहणाऱ्या अखिलेश साहूसोबत ही घटना घडली आहे. काही कामानिमित्त तो सिवनी येथील कान्हीवडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिनोतिया गावात आले होते. तो कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. बोलत असताना अचानक त्यांच्या मोबाईलमध्ये स्फोट झाला. सुरुवातीला अखिलेशला काही समजले नाही, पण थोड्या वेळाने त्याच्या चेहऱ्याला आणि डोळ्यांना दुखापत झाली. अखिलेशसोबत ही घटना घडली त्यावेळी त्यांच्यासोबत एक मित्र उपस्थित होता. त्याने घाईघाईने अखिलेशला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.
रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी जखमींवर उपचार सुरू केले. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून तरुणाचा जबाब नोंदवला. या स्फोटाची चौकशी केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तरूणाने आपला मोबाईल एक आठवड्यापूर्वीच घेतल्याचं सांगितलं आहे. तो कोणाशी तरी बोलत असताना अचानक मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला.
एका आठवड्यापूर्वी 27 हजार रुपये किमतीचा मोबाईल घेतल्याचं तरुणाने सांगितलं. नवीन मोबाईलमध्ये धमाका होईल हे माहीत नव्हतं. आता कंपनीने मला भरपाई द्यावी अशी माझी इच्छा आहे. या घटनेनंतर आता हा तरुण मोबाईल वापरायला घाबरत आहे. याबाबत ग्राहक मंचात तक्रार करणार असल्याचे तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.