लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना, बर्ड फ्लू अशा विविध साथींनी सध्या देशाला ग्रासले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद २०२१-२२च्या अर्थसंकल्पामध्ये करण्याची शक्यता आहे. त्या निधीमधून प्रधानमंत्री स्वास्थ्य संवर्धन ही नवी योजना राबविली जाईल.प्रधानमंत्री स्वास्थ्य संवर्धन योजनेची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आगामी अर्थसंकल्पात करण्याची शक्यता आहे. या योजनेच्या प्रस्तावात म्हटले आहे की, आरोग्य खात्याकरिता वर्षभरासाठी तरतूद केलेल्या स्वतंत्र निधीची रक्कम वित्तीय वर्ष संपले तरी अबाधित राहील. प्राप्तिकर व कॉर्पोरेट करावर केंद्र सरकार शिक्षण व आरोग्य विषयांसाठी ४ टक्के उपकर लादते. त्यातील ३ टक्के वाटा शिक्षण उपकराचा व १ टक्का वाटा आरोग्य उपकराचा असतो. या उपकरांतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी २५ टक्के रक्कम आरोग्य खात्यासाठीच्या स्वतंत्र निधीत वळती केली जाईल. हा निधी प्रामुख्याने आयुषमान भारत, पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजना यावर खर्च केला जाईल. स्वतंत्र निधीमुळे जगातील आणखी अद्ययावत उपचार भारतात उपलब्ध होऊ शकतील. सध्या राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या (जीडीपी) फक्त १.४ टक्के रक्कम आरोग्य क्षेत्रावर खर्च होते. पण हे प्रमाण २०२४ उजाडेस्तोवर ४ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विचार आहे.
नागरिकांना मोफत लस द्यावी -केजरीवालदेशभरातील नागरिकांना केंद्र सरकारने कोरोना लस मोफत द्यावी, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याबाबत विनंती केली आहे. जर ते त्यास तयार झाले नाहीत तर दिल्लीकरांना मोफत लस उपलब्ध करून देऊ, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. केजरीवाल म्हणाले, सर्वप्रथम आरोग्यसेवकांना ही लस दिली जाईल. केंद्र सरकार आणि शास्त्रज्ञांनी सर्वच टप्प्यांवरती काळजी घेत ही लस उपलब्ध केली आहे. केंद्र सरकार मोफत लसीबाबत कोणता निर्णय घेते ते कळेल. परंतु, केंद्राने ही बाब मान्य केली नाही तर आम्ही दिल्लीकरांचे मोफत लसीकरण करू, असे ते म्हणाले.
राजकीय नेत्यांना प्राधान्याने लस द्यापुडुचेरी : लोकांना विश्वास वाटण्यासाठी सर्व राजकीय नेते, मंत्री, खासदार यांना कोरोना लसीकरण मोहिमेत प्राधान्याने लस द्यावी, अशी मागणी पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून केली आहे.ते म्हणाले, सर्व राजकीय नेत्यांनी ही लस घेतल्याचे पाहून सर्वसामान्य जनतेचाही आत्मविश्वास वाढेल.