ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 27 - "दुख्तरान-ए-मिल्लत या फुटीरतावादी संघटनेची प्रमुख असिया अंद्राबी हिला जम्मू काश्मीर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंद्राबीला श्रीनगरमधील तिच्या निवासस्थानाहून ताब्यात घेण्यात आले.
काश्मीर खो-यातील महिलांना सुरक्षा दलातील जवानांवर दगडफेक करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व येथील जनजीवन विस्कळीत करण्याच्या आरोपाखाली असियाविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अशांतता पसरवण्याच्या आरोपाखाली असियाला अटक करण्यात आले होते. एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकावल्याबद्दल असिया विरोधात बेकायदा कृत्ये नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन तिला ताब्यात घेण्यात आले होते. 2015 मध्ये असियानं आपल्या जम्मू येथील निवासस्थानी 14 ऑगस्ट रोजी पाकिस्ताच्या स्वातंत्र्य दिन साजरा करत आपल्या समर्थकांसह पाकिस्तानी झेंडे फडकावले होते.
वादग्रस्त मुद्दे उपस्थित करुन प्रक्षोभक वक्तव्यं करणारी असिया काश्मीर खो-यातील महिलांना फुटीरतावादी कारवायांसोबत जोडण्याचं काम करते. 2008 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षापासून अंद्राबी कुख्यात दहशतवादी आणि 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या "जमात-उद-दावा" या दहशतवादी संघटनेसोबत काम करत होती, असा आरोप तिच्यावर आहे.