संयुक्त राष्ट्र : दहशतवादाला धर्मापासून वेगळे करण्याच्या मुद्यावर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्लामिक स्टेटसारख्या (इसिस) संघटनांमुळे फोफावत असलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या निराकरणासाठी जागतिक प्रतिक्रियेची आवश्यकता असल्याचे सांगितले. संयुक्त राष्ट्र आमसभेदरम्यान जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांच्याशी शुक्रवारी चर्चा करताना मोदी इसिससारख्या संघटनांमुळे निर्माण झालेल्या धोक्यावर मुख्यत्वे बोलले. युवकांना कट्टरवादापासून वाचविणे व दहशतवादी संदेशांचा कशाप्रकारे प्रतिकार करावा याबाबत उभय नेत्यांनी विचारविनिमय केला, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. इसिस हे आंतरराष्ट्रीय समुदायासमोरील सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक असल्याचे उभय नेत्यांनी मान्य केले. दहशतवादाला धर्मापासून वेगळे करण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले. आंतरराष्ट्रीय दहशतवादावर दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्वंकष कराराच्या प्रस्तावाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय समुदायाने या महत्त्वपूर्ण मुद्यावर एका सुरात बोलण्याची वेळ आली आहे. (वृत्तसंस्था)बैठकीत मोदींनी आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्धच्या लढाईत शाह अब्दुल्ला यांच्या कणखर नेतृत्वाची प्रशंसा केली. इराक आणि सीरियात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी जॉर्डनने केलेल्या मदतीबद्दलही मोदींनी त्यांचे आभार मानले. एक भागीदार म्हणून आपण भारताला खूप महत्त्व देतो. आपण दोन्ही देशांत आर्थिक व सुरक्षा सहकार्य वाढवू इच्छितो, असे शाह अब्दुल्ला यांनी म्हटल्याचे स्वरूप यांनी सांगितले.
दहशतवादाला धर्मापासून वेगळे करा - मोदी
By admin | Published: September 26, 2015 9:53 PM