जयशंकर गुप्त, नवी दिल्लीशिवसेनेसोबत युती तुटल्याने अनेक वर्षे रेंगाळलेला वेगळ्या विदर्भाचा मुद्दा भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात असेल, असे अलीकडच्या राजकीय तांडवावरून वाटत असतानाच भाजपाच्या गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरनाम्यातून हा विषयच वगळल्याचे स्पष्ट झाले आहे.केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्याबाबतचे संकेत बुधवारी येथे दिले. छोट्या राज्यांची निर्मिती हे पक्षाचे धोरण असून, विदर्भाचा मुद्दा पक्षाच्या मागणीचा मुख्य भाग आहे, असे ते म्हणाले़ मात्र स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा जाहीरनाम्यात असेल का, या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले. जावडेकरांच्या या संकेतावरून पक्षाच्या जबाबदार सूत्राने सांगितले, की हा मुद्दा जाहीरनाम्यात नसेल. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केल्याने भाजपाने हा मुद्दा जाहीरनाम्यातून वगळल्याचे सांगण्यात येते. पण प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाचा मुद्दा आम्ही सोडलेला नाही; जी भूमिका आधी होती तीच आजही आहे, असे सांगितले. त्यामुळे भाजपातील अंतर्गत विरोधाभास पुन्हा अधोरेखित झाला आहे.
भाजपाच्या जाहीरनाम्यातून वेगळा विदर्भ वगळला !
By admin | Published: October 09, 2014 5:00 AM