नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या जम्मू आणि काश्मीर दौऱ्यापूर्वी देशापेक्षा कुणीही मोठा नाही असा दम फुटरतावाद्यांना भरला होता. आता पुन्हा लोकसभेत बोलताना शहा यांनी काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. काश्मीरमधील शाळा बंद करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची मुलं परदेशात शिकतात असा टोला अमित शहा यांनी लगावला आहे.
गृहमंत्री बनल्यानंतरचा अमित शाह यांचा पहिला काश्मीर दौरा नुकताच झाला आहे. आपल्या या दौऱ्यापूर्वीच त्यांनी फुटीरतावाद्यांशी चर्चा करणार नसून त्यांची कुठलिही अट मान्य करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तर मंगळवारी लोकसभेत बोलताना त्यांनी फुटीरतावादी नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. काश्मीरमधील शाळा पेटवून दिल्या जातात, शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची हत्या केली जाते. महाविद्यालय आणि वाचनालय पेटवून दिले जाते. मात्र हे सर्व घडवून आणणारे फुटीरतावादी नेत्यांची मुलं परदेशात शिकतात असा खोचक टोला अमित शहा यांनी लगावला आहे.
काश्मीरमधील १३० असे फुटीरतावादी नेत्यांची आपल्याकडे यादी आहे, ज्यांची मूले सौदी अरबीया आणि लंडनमध्ये शिक्षण घेतात. एवढच नाही या नेत्यांची मूले विदेशात नोकरी करून महिन्याला लाखोचा पगार मिळवतात. दुसरीकडे हीच फुटीरतावादी नेते काश्मीरमधील शाळा बंद पाडतात. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील तरुणांनी अशा नेत्यांवर विश्वास ठेवू नयेत असे आवाहन अमित शहा यांनी केले.
सर्वसामान्य लोकांच्या दोन पिढ्यांना या नेत्यांनी शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा काम केलं आहे . अशाच नेत्याचे उदाहरण देताना शहा म्हणाले की, एका फुटीरतावादी नेत्याचा मुलगा हा सौदी अरबमध्ये उच्च शिक्षण घेऊन आज ३० लाख महिन्याने नोकरी करत आहे. दुसऱ्या एक नेत्याचा मुलाने लंडनमध्ये शिक्षण घेऊन सौदी अरबीयात हॉस्पिटल सुरु केले आहे. तर हेच नेते आमच्या देशातील तरुणांचे भविष्य अंधारात ढकलण्याचे काम करत असल्याचे शहा म्हणाले.