विजयवाडा - एकीकडे महाराष्ट्रात साईबाबा यांचा जन्म कुठे झाला यावरुन वादंग निर्माण झालेला असताना हा वाद कोर्टापर्यंत गेला आहे. तर साईबाबांनी दिलेली शिकवण आजही साईभक्त मोठ्या श्रद्धेने पाळत आहेत. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे साई मंदिराबाहेर बसणाऱ्या ७३ वर्षीय भिकाऱ्याने साई मंदिराला तब्बल ८ लाखांची देणगी दिल्याने परिसरात चर्चा होऊ लागली आहे.
७३ वर्षीय याडी रेड्डी असं या भिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या ७ वर्षापासून याडी रेड्डी मंदिराबाहेर भीक मागण्याचं काम करत आहे. जवळपास ४ दशक याडी रेड्डी यानी सायकल रिक्षा खेचण्याचं काम केलं. एका अपघातात त्यांना आपले पाय गमवावे लागले त्यानंतर त्यांनी मंदिराबाहेर भीक मागण्यास सुरुवात केली.
याबाबत बोलताना याडी रेड्डी म्हणाले की, गेली ४० वर्ष मी रिक्षा खेचण्याचं काम करत होतो. सुरुवातीला मी १ लाख रुपये देणगी साई मंदिरासाठी दिली. त्यानंतर माझी तब्येत खालावत असल्याने माझ्याकडे असणाऱ्या पैशाची मला गरज भासली नाही म्हणून मी मंदिरासाठी आणखी देणगी देण्याचा निर्णय घेतला.
तसेच ज्यावेळी मी मंदिरासाठी दान द्यायला लागलो त्यानंतर माझ्या कमाईतून वाढ होत असल्याचा अनुभव मला आला. मंदिरासाठी मी इतकं दान दिलेलं पाहून लोकं मला ओळखू लागली. त्यामुळे मला आश्चर्य झालं की माझ्या कमाईत वाढ होतेय. आजतागायत मी मंदिराला ८ लाख रुपये देणगी दिली आहे. यापुढेही माझी कमाई मी मंदिरासाठी देईन असं याडी रेड्डी यांनी सांगितले.
याडी रेड्डी यांनी दिलेली देणगी पाहून मंदिर विश्वस्तांनीही त्यांचे कौतुक केले. याडी रेड्डींनी दिलेली देणगी मंदिराच्या उपयोगासाठी येणार असून त्यांच्या पैशातून गोशाळा बांधण्याचा आमचा मानस आहे. आम्ही कधीही भाविकांना देणगी देण्याची मागणी करत नाही. पण लोक स्वखुशीने देणगी देतात असं मंदिर विश्वस्तांनी सांगितले. याडी रेड्डी यांच्या आयुष्यात इतका खडतर संघर्ष झाला तरीही त्यांनी पैशाचा मोह न बाळगता तो संपूर्ण पैसा मंदिराला दान केल्याने परिसरातील लोकांमध्ये त्यांची प्रसिद्धी वाढत आहे.