मंगळुरू : साखळी पद्धतीने खून करणाऱ्या (सिरियल किलर) ‘सायनाईड’ मोहन याला स्थानिक न्यायालयाने महिलेची (२५) बलात्कार करून हत्या केल्याबद्दल दोषी ठरवले असून, २४ जून रोजी त्याला शिक्षा सुनावली जाईल, अशी अपेक्षा आहे. बलात्कार व हत्या झालेली महिला केरळमधील कासारगोडची होती. महिलांशी मैत्री करून मग त्यांच्यावर बलात्कार करायचा व त्यानंतर त्यांची हत्या करण्याची मोहनची पद्धत होती. अनेक महिलांना त्याने अशा पद्धतीने संपवले असून, ज्या महिलेवरील बलात्कार व हत्या प्रकरणात त्याला दोषी ठरवले गेले तो त्याच्याविरुद्ध दाखल झालेला शेवटचा २० वा हत्येचा गुन्हा होता.२५ वर्षांची महिला कासारगोडमध्ये महिलांच्या वसतिगृहात स्वयंपाकी होती. २००९ मध्ये मोहनशी तिची ओळख झाली होती. मोहन तीन वेळा तिच्या घरी गेला होता व त्याने तिला लग्नाचे आश्वासनही दिले होते. ८ जुलै, २००९ रोजी ती महिला सुल्लिया येथील मंदिरात जाते म्हणून घरातून बाहेर पडली. मोहनने तिला बंगळुरूला नेले. त्याच्या कुटुंबियांनी त्याला तिच्याबद्दल विचारल्यावर त्याने आम्ही लग्न केल्याचे व लवकरच घरी येत असल्याचे सांगितले. मोहनने तिला बसस्थानकाजवळच्या लॉजवर नेले. दुसºया दिवशी लॉज सोडताना त्याने तिला तिचे दागिने त्या खोलीतच ठेवण्यास सांगितले. नंतर ते दोघेही बसस्थानकावर गेले व त्याने तिला गर्भप्रतिबंधक गोळी असल्याचे सांगून सायनाईड असलेली गोळी खायला दिली व तो तेथून निघून गेला, असे सरकारी वकिलाने सांगितले. ती गोळी खाताच ती बसस्थानकाच्या स्वच्छतागृहापाशी कोसळून पडली. एका पोलीस कर्मचाºयाने तिला रुग्णालयात नेले. तेथे तिला मृत घोषित केले गेले.आॅक्टोबर २००९ मध्ये मोहनला अटक झाल्यानंतर त्या मृत महिलेच्या बहिणीने त्याची छायाचित्रे पाहिल्यावर त्याला ओळखले आणि तक्रार दिली. मोहन याला या आधी पाच खटल्यांत मृत्युदंडाची, तर तीन खटल्यांत जन्मठेपेची शिक्षा झाली. मृत्युदंडाच्या पाच खटल्यांत त्याची शिक्षा नंतर जन्मठेपेत रूपांतरित झाली आहे.
सिरियल किलर सायनाईड मोहन दोषी; शिक्षा बुधवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 1:13 AM