पणजी : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळामुळे गोव्यासह देशातील अनेक भागांना पावसाचा जोरदार तडाखा बसला. ते शमते तोच अरबी समुद्रात आणखी एक वादळ आकार घेत आहे. त्याला हवामान खात्याने तूर्त कमी दाबाचा पट्टा असे म्हटले आहे.
हा पट्टा उत्तर-पूर्व आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण झाला आहे. त्याचा वेग सध्या कमी असला तरी तो वाढत जाणार आहे. दिलासादायक गोष्ट अशी की, हा कमी दाबाचा पट्टा पश्चिमेच्या दिशेने सरकत असल्यामुळे ते चक्रीवादळात जरी रूपांतर झाले तरी फार मोठा परिणाम गोवा व देशात होण्याची शक्यता कमीच आहे. पावसाच्या सरी मात्र कोसळण्याची मोठी शक्यता आहे.
उष्ण कटिबंधातील भारतीय उपपखंडात वादळे आणि चक्रीवादळे मान्सूनचे आगमन वेळी आणि माघारीच्या वेळी निर्माण होतात. बंगालच्या खाडीत ती अधिक प्रमाणावर तयार होतात. अरबी समुद्रात तुलनेने कमी होतात. मागील आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली स्थिती चक्रीवादळापर्यंत गेली नसली तरी अनेक भागांत पाऊस पडला. काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली.
परतीच्या पावसावरही होणार परिणामआता अरबी समुद्रातील बदललेल्या स्थितीमुळे त्याचा गोव्यासह किनारपट्टी भागात परिणाम जाणवणार आहे. उत्तर महाराष्ट्रात परतीचा पाऊस पोहोचला आहे. गोव्यात तो १४ आॅक्टोबरदरम्यान पोहोचतो; परंतु बंगालच्या खाडीतील वादळामुळे तो लांबणीवर पडला. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम परतीच्या पावसावरही होणार असल्याचे हवामान खात्याचे शास्त्रज्ञ सांगतात.
हवामान खाते म्हणते, कमी दाबाचा पट्टा -- सध्या पश्चिमेच्या दिशेने प्रवास- चक्रीवादळात रूपांतर झाले तरी गोव्यासह देशाला धोका कमी- किनारपट्टीसह अनेक भागांत मात्र जोरदार पावसाची शक्यता