नवी दिल्ली: 1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात शीखांविरुद्ध हिंसाचार उसळला होता. त्या दंगलीप्रकरणी दिल्लीचे माजी खासदार आणि काँग्रेस नेते सज्जन कुमारला न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने त्यांच्यावरील आरोप निश्चित केले आहेत. 1984 च्या शीखविरोधी दंगलीदरम्यान दिल्लीच्या राज नगरमध्ये शीखांची हत्या आणि गुरुद्वारातील जाळपोळप्रकरणी न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांच्यावर आयपीसीच्या अनेक कलमांखाली दंगल, खून, दरोडा इत्यादी प्रकरणात आरोप निश्चित केले आहेत.
1984 ला झालेल्या दंगलीदरम्यान दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या पालम कॉलनीत राज नगर पार्ट-1 मध्ये 5 शीखांची हत्या आणि राज नगर पार्ट-2 मधील गुरुद्वारा जाळण्यात आला होता. त्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सज्जन कुमारला 2013 मध्ये निर्दोष ठरवले होते. पण, वरिष्ठ न्यायालयाने तो निर्णय बदलला आहे. आता सज्जन कुमारवर दंगल भडकवणे, खून आणि दरोडा इत्यादी आरोप निश्चित करण्यात आले आहे. 16 डिसेंबरला पुढील सुनावणी होईल.
2 नोव्हेंबर 1984ला झालेल्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 1991 मध्ये एफआयआर नोंदवला होता, परंतु पुराव्याअभावी 1993 मध्ये या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने तो फेटाळून लावला. दंगलीची सुनावणी करताना, 17 डिसेंबर 2018 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता ज्यामध्ये सज्जन कुमारला जन्मठेपेची आणि इतर आरोपींना 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखविरोधी दंगली उसळल्या
1984च्या शीख विरोधी दंगली या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या भारतीय शीखांविरुद्धच्या दंगली होत्या. इंदिरा गांधींची हत्या त्यांच्याच शीख अंगरक्षकाने केली होती. सरकारच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील दंगलींमध्ये सुमारे 2,800 शीख आणि देशभरात 3,350 शीख मारले गेले. पण, काही स्वतंत्र स्त्रोतांचा अंदाज आहे की, देशभरात मृतांची संख्या सुमारे 8,000-17,000 होती.