नवी दिल्ली: भारताच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान/कार्यालय असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेत गंभीर चुक झाल्याचं समोर आलं आहे. अतिशय हायसेक्युरिटी असलेल्या राष्ट्रपती भवनात रात्रीच्या वेळी दारू पिलेले दोघेजण घुसल्याची घटना घडली आहे. राष्ट्रपती भवनात घुसून दोघे फिरत होते. बऱ्याच वेळानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी एक मुलगा आणि मुलगी रात्री कारमधून राष्ट्रपती भवनात घुसले होते. ही अतिशय गंभीर आणि संवेदनशील बाब आहे. राष्ट्रपती भवनात घुसून बराचवेळ दोघे मध्ये फिरले. मात्र, नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं. चौकशी केल्यानंतर दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोघेही दारुच्या नशेत होते. पकडलेल्या मुलाचे नाव मोहित असून तो 25 वर्षांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे राष्ट्रपती भवनात घुसणे अतिशय गंभीर बाब असून, पोलिस आता या दोघांवर योग्य ती कारवाई करू शकतात. दरम्यान, राष्ट्रपती भवनासारख्या हायसेक्युरिटी असलेल्या ठिकाणात अशाप्रकारे घुसखोरी झाल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.