गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने दणदणीत विजय मिळवला होता. तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला होता. तेव्हापासून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून महाराष्ट्रातील निवडणुकीवर शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा अमेरिकेत उपस्थित केला. येथील ब्राऊन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी देशाच्या निवडणूक प्रक्रियेत गंभीर समस्या अससल्याचा आरोपही केला.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राहुल गांधी म्हणाले की, स्पष्टच शब्दात सांगायचं तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत तरुणांच्या संख्येपेक्षा अधिक मतदान झालं. हे एक वास्तव आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतची आकडेवारी दिली. संध्याकाळी ५.३० ते ७ या मतदान संपवण्याच्या काळात तब्बल ६५ लाख मतदारांनी मतदान केलं. प्रत्यक्षात असं घडणं कठीण आहे. त्याचं कारण म्हणजे एका मतदाराला मतदान करण्यासाठी किमान ३ मिनिटं लागतात. मोजणी केली तर संपूर्ण मतदान होण्यासाठी रात्रीचे २ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसल्या असत्या. तसेच रात्रभर मतदान चाललं असतं. मात्र प्रत्यक्षात असं काही घडलं नाही.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, या कारणामुळेच आम्ही त्यांना मतदानाचं चित्रिकरण झालं आहे का असं विचारलं, मात्र त्यांनी चित्रिकरण देण्यास नकार दिला. एवढंच नाही तर त्यांनी कायदाच बदलला. त्यामुळे आता चित्रिकरण मागता येणार नाही. यावरून निवडणूक आयोगाने काही तडजोडी केल्या आहेत, हे स्पष्ट झालं आहे. तसेच या व्यवस्थेमध्ये खूप गडबड झाली आहे, हेही स्पष्ट होत आहे. आम्ही याबाबत अनेकदा सार्वजनिकरीत्या आवाज उठवला आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.