नवी दिल्ली - ईशा फाऊंडेशनचे सद्गुरू आणि स्पिरीच्युअल गुरू जग्गी वासूदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी करण्यात आली आहे. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून स्वत: सद्गुरूंनीच याबाबत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली. सद्गुरूंच्या डोक्यात सुज आली होती, तसेच रक्तश्राही झाला होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र, वेळीच शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांची प्रकृती आता बरी आहे.
सद्गुरूंना गेल्या महिनाभरापासून डोकेदुखी त्रास सुरू झाला होता. त्यानंतर, त्यांनी रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दिल्लीच्या अपोलो रुग्णालयातील सीनियर कंसल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सूरी यांनी याबाबत माहिती दिली. सद्गुरू यांची प्रकृती ही 'लाइफ थ्रेटनिंग' स्थितिप्रमाणे होते. ब्लीडिंगसह त्यांच्या मेंदूमध्ये गंभीर सूज आल्याचे सीटी स्कॅनमध्ये निष्पन्न झाले. गेल्या ४ महिन्यांपासून सद्गुरूंना डोकेदुखीचा त्रास सुरू होता. दररोजच्या व्यापामुळे सद्गुरू डोकेदुखीकडे दुर्लक्ष करत होते. मात्र, ते जीवावर बेतले असते. परंतु, वेळीच शस्त्रक्रिया केल्यामुळे आता सद्गुरूंची प्रकृती स्थीर आहे. याबाबत, ईशा फाऊंडेशननेही अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.