नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी शनिवारी नवी दिल्लीत एम्सपासून ‘सेवा सप्ताहा’चा शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (१७ सप्टेंबर) भाजप १४ ते २० सप्टेंबरपर्यंत देशात ‘सेवा सप्ताह’ साजरा करीत आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांनी यादरम्यान हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळांचे वाटप केले आणि परिसरात स्वच्छता केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना अमित शहा म्हणाले की, भाजप पाच वर्षांपासून मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’साजरा करीत आहे. पंतप्रधान मोदी यांचे जीवन देशाची सेवा आणि गरिबांसाठी काम करण्यात समर्पित राहिलेले आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा वाढदिवस सेवा सप्ताहच्या स्वरूपात साजरा करतो.शहा म्हणाले की, कार्यकर्ते यानिमित्त स्वच्छता कार्यक्रम, वृक्षारोपण, श्रमदान यासारखे कार्यक्रम आयोजित करीत आहेत. त्यांचे पूर्ण लक्ष्य समाजातील तळागाळातील व्यक्तीच्या कल्याणाकडे केंद्रित झालेले आहे.भाजपने सेवा सप्ताह साजरा करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. त्याचे संयोजक पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना आहेत. यात केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल, सचिव सुधा यादव व सुनील देवधर यांचाही सहभाग आहे.सेवा सप्ताहाचे मुख्य लक्ष्य स्वच्छता व सेवा कार्यक्रम हे आहे. या काळात रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, डोळ्यांची तपासणी, दिव्यांगांना उपकरणांचे वाटप, गरजवंतांना मदत आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान मोदींच्या जीवनावरील पुस्तके, छायाचित्रे लोकांना वितरित करण्यात येतील. प्रदर्शने, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शहांकडून एम्समध्ये ‘सेवा सप्ताहा’ची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 4:40 AM