नवी दिल्ली - 17 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता संसदेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक विस्कळीत झालेले दिसत आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र विरोधी पक्षांकडून अशा प्रकारचे कुठलेही पाऊल उचललेले दिसून आले नाही. लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊ शकते, असे राज्यसभा खासदार पी.एन. पुनिया यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे विरोधी पक्षांच्या आत्मविश्वासाला प्रचंड धक्का बसला आहे. आता सोमवारपासून अधिवेशनाला सुरुवात होत असली तरी पराभवाच्या धक्क्यातून विरोधी पक्ष अद्याप सावरलेले नाहीत. त्यामुळे संसदेत सत्ताधारी पक्षाला घेरण्याची पुरेशी तयारीही विरोधी पक्षांनी केलेली नाही. सरकारविरोधात जाणाऱ्या कुठल्याही मुद्द्यावर विरोधी पक्षांमध्ये एकमत करण्याचा प्रयत्न दिसून आलेला नाही. तसेच यासंदर्भात विरोधी पक्षांकडून कुठलेलीही अधिकृत वक्तव्यही समोर आलेले नाही.
संसदेचे अधिवेशन सोमवारपासून, पण काँग्रेसच्या लोकसभेतील नेत्याविषयी अद्याप अनिश्चितता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 5:47 PM