Himachal Pradesh Congress ( Marathi News ) :हिमाचल प्रदेशमध्येकाँग्रेस आमदारांच्या बंडामुळे सुखविंदर सिंह सुख्यू यांच्या नेतृत्वाखालील सरकार अडचणीत आलं होतं. मात्र आज सकाळी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या १५ आमदारांना निलंबित केलं आणि त्यानंतर आता अर्थसंकल्पही बहुमताने सादर करण्यात आल्याने सुख्यू यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळण्याचा धोका पुढील ३ महिन्यांसाठी टळला आहे. त्यामुळे काँग्रेस सरकार जाणार असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला धक्का बसला आहे.
हिमाचलमध्ये कालपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावेळी काल काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केले. राज्याबाहेर गेलेले हे आमदार आज पुन्हा हिमाचल प्रदेशात आले. मात्र आमचा पाठिंबा भाजपला असल्याचं काँग्रेसच्या या नाराज आमदारांनी स्पष्ट केलं. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळणार की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी आज गोंधळ घातल्याचा आरोप करत भाजपच्या तब्बल १५ आमदारांना निलंबित केलं. त्यामुळे सभागृहातील भाजपची ताकद क्षीण झाली आणि याच संधीचा फायदा घेत मुख्यमंत्री सुख्यू यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे पुढील ३ महिन्यांसाठी मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्यू यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दरम्यान, अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर विधानसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं आहे.
काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर हल्ल्याचा प्रयत्न
विधानसभेच्या गेटवर आज सकाळी मोठा गोंधळ झाला. येथे काँग्रेस समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. बंडखोर आमदार येताच काँग्रेस समर्थकांनी त्यांना विरोध करत गोंधळ घातला. विधानसभेच्या बाहेरील बॅरिकेड्स तोडण्यात आले. याशिवाय, या आमदारांच्या वाहनांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता.