जयपूर : विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये तर सरकार असतानाही काँग्रेसला सत्ता वाचवण्यात अपयश आल्याने स्थानिक नेतृत्वावर टीकेचा भडीमार होत आहे. राजस्थानच्या राजकारणात जादूगर अशी ओळख असलेल्या अशोक गहलोत यांच्या नेतृत्वातील पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. अशातच आता अशोक गहलोत हे मुख्यमंत्री असताना त्यांचे विशेष कार्य अधिकारी असलेल्या लोकेश शर्मा यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात पक्षाचे नेते सचिन पायलट यांच्या हालचालींवर बारिक नजर ठेवली जात होती आणि त्यांचा फोनही टॅप केला जात होता, असा दावा शर्मा यांनी केला आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. काँग्रेसच्या पराजयाची जी काही कारणे होती त्यामध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेसचे मातब्बर नेते सचिन पायलट यांच्यातील मतभेद, हेदेखील एक प्रमुख कारण होते. २०१८ मध्ये सरकार स्थापन झाल्यापासूनच दोन्ही नेत्यांमध्ये सतत खटके उडत होते. पायलट यांनी मुख्यमंत्री गहलोत यांच्याविरोधात आपल्या समर्थक आमदारांसह बंडही केलं होतं. मात्र कसलेले राजकारणी असलेल्या गहलोत यांनी नंतर हे बंड मोडून काढण्यात यश मिळवलं. तसंच अनेकदा शेलक्या शब्दांत सचिन पायलट यांच्यावर तोफ डागली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पायलट हे प्रचारादरम्यान काहीसे अलिप्त असल्याचं बघायला मिळालं. मात्र आपल्याला पर्यायच निर्माण होऊ नये, असा प्रयत्न सातत्याने मुख्यमंत्री गहलोत यांनी केल्याचा आरोप त्यांचेच विशेष कार्य अधिकारी लोकेश शर्मा यांनी केला आहे.
लोकेश शर्मा यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत; गहलोत यांच्यावर कोणकोणते आरोप केले?
काँग्रेसच्या पराभवानंतर लोकेश शर्मा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "जो निवडणूक निकाल आला, त्यामुळे मी निराश नक्कीच आहे, मात्र मला या निकालाचं आश्चर्य अजिबात वाटलं नाही. काँग्रेस पक्ष पुन्हा सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत होता, पण अशोक गहलोत हे मात्र कोणताही बदल करण्याच्या मनस्थितीत नव्हते. हा काँग्रेस नव्हे तर केवळ गहलोत यांचा पराभव आहे. गहलोत यांच्याकडून पक्षनेतृत्वाची फसवणूक, त्यांना योग्य फीडबॅक न देणे, पर्याय म्हणून कोणालाही तयार न होऊ देणं, अपरिपक्व आणि फक्त स्वत:च्या फायद्यासाठी जवळ असलेल्या लोकांचं ऐकून चुकीचे निर्णय घेणं, पराभूत होण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवारांनाच तिकिटं दिली जात होती," असा हल्लाबोल शर्मा यांनी केला आहे.
"मी स्वत:ही गावखेड्यात जाऊन लोकांशी संवाद साधत काही महिन्यांपूर्वी एक रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना दिला होता. मात्र त्यावर त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. पक्षसंघटनेत कसलाही बदल केला नाही," असा दावाही लोकेश शर्मा यांनी केला आहे.