Shridhar Patankar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण पाटणकर यांना विनातारण कर्ज देणाऱ्या नंदकिशोर चतुर्वेदी यांची लखनौ येथील २०० एकर जमीन सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त केली आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याकडून हमसफर डिलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने ही जमीन खरेदी करण्यात आली होती. टाऊनशीप बनवण्याच्या उद्देशाने ही जमीन खरेदी करण्यात आल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर जमीन ही दिल्ली येथील आठ शेल कंपन्यांनी अधिग्रहित केली होती. तसंच एंट्री ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नियंत्रणाखालील हमसफर डीलरद्वारे एकात्मिक टाउनशिप म्हणून ही जमीन विकसित केली जात होती. मात्र आता ईडीकडून बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही जमीन जप्त करण्यात आली आहे.
ईडीने याआधीही केली होती कारवाई
सक्तवसुली संचालनालयाने यापूर्वी पुष्पक ग्रुपच्या ६ कोटी ४५ रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. यामध्ये श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका सील करण्यात आल्या होत्या. श्रीधर पाटणकरांच्या कंपनीला कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी दोन डझनहून अधिक कंपन्यांचे संचालक आहेत.
नंदकिशोर चतुर्वेदी संचालक असलेल्या बहुतेक कंपन्या शेल कंपन्या असल्याचा संशय आहे. ईडी आणि आयकर विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदकिशोर चतुर्वेदी पेशाने सीए आहे. मात्र कोणतीही सीए फर्म चालवत नाहीत. नंदकिशोर चतुर्वेदी शेल कंपनी ऑपरेट आहेत, असे सांगितले जाते. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या एकाच पत्त्यावर दहापेक्षा अधिक शेल कंपन्यांची नोंदणी आहे. मुंबई, कोलकाता आणि दिल्लीमध्ये विविध ठिकाणी शेल कंपन्यांची स्थापना केल्या आरोप त्यांच्यावर आहे.