- विकास झाडेनवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी दिल्लीत यूपीएससीची तयारी करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची कायमची सोय व्हावी म्हणून वसतिगृह उभारण्याचा संकल्प केला आहे. कोविड काळात त्यांनी सुरू केलेल्या चांगुलपणाच्या चळवळीच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यांनी लोकप्रतिनिधींना मदतीचे आवाहन केले आहे. डॉ. मुळे हे भारतीय परराष्ट्र सेवेतून निवृत्त झाले आहेत. दिल्लीत असताना त्यांनी मराठी लोकांसाठी ‘पुढचे पाऊल’ ही सांस्कृतिक चळवळ सुरू केली.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. मुळे म्हणाले, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी सुमारे दरवर्षी ५ ते ६ हजार उमेदवार दिल्लीला येत असतात; दिल्लीत स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण महागडे आहे. शिकवणी शुल्क, निवास आणि जेवणाची सोय यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. महाराष्ट्रातील जनतेबाबत अभिमान असलेले श्रीमंत व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेतल्यास हे वसतिगृह नक्की उभे राहील.
खा. तुमाणे यांचे २५ लाख रुपये
रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे हे त्यांच्या खासदार निधीतून २५ लाख रुपये देत आहेत, अन्य खासदारांनीही मदत करण्याचे आवाहन त्यांनी केल्याची माहिती डॉ. मुळे यांनी दिली.