Pathaan Movie : जी भीती होती तेच झालंय. बॉलिवुड किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) ३ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर येतोय. पठाण सिनेमातून तो चाहत्यांच्या भेटीला येतोय. पण सध्या बॉलिवुड चित्रपट बॉयकॉट (Boycott) करण्याचा ट्रेंडच सुरु झाला आहे. पठाणही बॉयकॉट करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. पठाणच्या बेशरम रंग (Besharam Rang) गाण्यात दीपिकाने भगवा रंगाची बिकीनी घालून केलेल्या बोल्ड डान्सवर आक्षेप घेण्यात येतोय.
अयोध्येतील महंत राजू दास यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'पठाण'वर बहिष्काराची मागणी केली आहे. इतकंच नाही, तर पठाण चित्रपट ज्या ज्या सिनेमागृहांमध्ये लावला जाईल ते जाळून टाकण्याचंही आवाहन महंत राजू दास यांनी केलं आहे. शाहरुख खाननं सनातन धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप राजू दास यांनी केला आहे.
अयोध्या चे महंत राजू दास म्हणतात, ' "बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये सातत्यानं सनातन धर्माची कशी खिल्ली उडवता येईल याचाच प्रयत्न केला जात आहे. हिंदू देवीदेवतांचा कसा अपमान करता येईल याची संधी शोधली जाते. पठाण चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनं बिकनी परिधान करुन साधूसंतांची आणि राष्ट्राच्या भगव्या रंगाचा अपमान केला आहे"
सिनेमात भगव्या रंगाच्याच बिकिनीचा वापर करण्याचं काय कारण होतं. हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवण्यासाठी हे मुद्दाम केलं गेलं. लोकांनीच यावर कठोर कारवाई केली पाहिजे. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकावा. तसंच हा सिनेमा ज्या थिएटरमध्ये लागेल ते जाळून टाका. अशा लोकांसोबत अशाच प्रकारे वागायला हवं, असं राजू दास म्हणाले.
'पठाण' सिनेमा नववर्षात २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या सिनेमातील 'बेशरम रंग' गाणं प्रदर्शित झालं. यात दीपिकाचा बोल्ड लुक पाहायला मिळत आहे.