हैदराबाद : सत्तेत आल्यास अल्पसंख्याक तरुणांसाठी विशेष आयटी पार्क उभारण्यात येईल, असे आश्वासन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले. महेश्वरम येथे एका प्रचारसभेत ते बाेलत हाेते.राव म्हणाले, आज आम्ही पेन्शन देत आहाेत. ती मुस्लिमांनाही मिळत आहे. निवासी शाळांमध्ये मुस्लीम विद्यार्थीदेखील शिकतात. आम्ही सर्वांना साेबत घेऊन चालताे. आता आमची हैदराबादजवळच्या परिसरात विशेष आयटी पार्क उभारण्याची याेजना आहे, असे राव म्हणाले.
‘बीआरएस, काॅंग्रेस दाेघांचीही आश्वासने खाेटी’
हैदराबाद : काॅंग्रेस आणि सत्ताधारी बीआरएस हे दाेन्ही पक्ष जनतेला खाेटी आश्वासने देत असल्याची टीका भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. ते संगारेड्डी येथील एका प्रचारसभेत बाेलत हाेते.काॅंग्रेसने कर्नाटकमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा दावा करून नड्डा म्हणाले की, तेथील जनता अजूनही २०० युनिट माेफत विजेच्या प्रतीक्षेत आहे. काॅंग्रेस आणि केसीआर गॅरंटीच्या गाेष्टी करतात. काेणीही सत्तेत आले तरी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचीच गॅरंटी आहे.