नवी दिल्ली - शिवसेनेच्या आमदारांसोबत आता खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना या खासदारांनी त्यांची भेट घेतली. पक्षाच्या एकूण १९ खासदारांपैकी १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यामुळे आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेला खासदारांनीही धक्का दिला आहे. शिवसेनेच्या समर्थक खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.
या खासदारांचा समावेशश्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, हेमंत पाटील, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, प्रताप जाधव, भावना गवळी, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
शिवसेनेने मला भरभरून दिले, त्यामुळे...मी शिवसेनेत कार्यकर्त्यापासून नेता झालोय, अपेक्षेपेक्षा खूप जास्त पक्षाने दिले. एवढं पक्षाने दिल्यानंतर पक्षाची प्रतारणा करणं हे माझ्या विचारात बसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र विधानसभेत आलो होतो. आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आनंद आहे. तुटेपर्यंत ताणू नये. एका वटवृक्षाखाली वाढलो त्यावर घाव घालताना वेदना होतात. एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी समेट घडवून आणावा. सामान्य शिवसैनिकाचं यात नुकसान होत आहे असं सांगत खासदार संजय जाधव यांनी शिंदे गटात सहभागी होण्यास नकार दिला.
आमचीच मूळ शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर खासदारांची बैठक घेऊन आमचीच मूळ शिवसेना असल्याचा दावा करतील व एनडीएमध्ये त्यांना अधिकृतपणे सामावून घेतले जाईल, असे मानले जात आहे. आमदारांच्या बंडाबाबतही त्यांनी हीच भूमिका घेतली होती. ठाकरे गटाचे विनायक राऊत हे पक्षाचे लोकसभेतील नेते असून राजन विचारे हे प्रतोद आहेत. त्यांच्या जागी राहुल शेवाळेंची गटनेतेपदी, तर भावना गवळी यांची प्रतोदपदी नियुक्ती केली जाणार आहे. त्याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देण्यात आले आहे. खासदारांनी वेगळी चूल मांडल्यामुळे ठाकरे गटास आता कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागेल.