भिंड (मध्य प्रदेश) : गाईच्या वासराची अनवधानाने हत्या झाल्याबद्दल जात पंचायतने एका वृद्ध महिलेला दुस-या गावात जाऊन सात दिवस भीक मागणे आणि गंगेत स्रान करण्याची अजब शिक्षा सुनावली.कमलेशी देवी (६०) ही वृद्ध महिला गेल्या शुक्रवारी गाईचे दूध पित असलेल्या वासराला ओढत असताना अचानक वासराच्या गळ्याला बांधलेली दोरी आवळली आणि त्यात वासराचा श्वास कोंडल्याने मृत्यू झाला.गोवंश हत्या हे महापाप आहे आणि या पापाची शिक्षा भोगलीच पाहिजे, असा पक्का समज असलेल्या जात पंचायतने मग सभा भरविली आणि कमलेशी देवीला या ‘पापा’ची शिक्षा म्हणून दुसºया गावात जाऊन सलग सात दिवस भीक मागणे आणि त्यानंतर गंगा स्रान करण्याचे फर्मान सोडले. ग्राम पंचायत सदस्य मुकेश गर्ग यांनी सोमवारी ही माहिती दिली.कमलेशी देवी ही श्रीवास या मागास जातीची आहे. तिच्या जातीच्या लोकांनी शनिवारी पंचायत भरविली आणि तीत कमलेशी देवीला पापमुक्त करण्यासाठी अशी अजब शिक्षा सुनावली. कमलेशी देवी ही विधवा आहे. भीक मागणे आणि गंगा स्रान करण्यासोबतच गावातील मुलींना स्वखर्चाने जेवन देण्याचा आदेशही पंचायतने दिला, असे गर्ग यांनी सांगितले. जात पंचायतचा हा आदेश अमानवीय आणि बेकायदेशीर असल्याचे ते म्हणाले.‘आजच्या आधुनिक युगात अशाप्रकारचे फतवे काढणे असमर्थनीय आहे. याबाबत पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे,’ असे गर्ग म्हणाले.जात पंचायतने शिक्षा सुनावल्याबरोबर कमलेशी देवी बेशुद्ध पडली. सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजित मिश्रा यांनी दिली.कमलेशी देवीचा मुलगा अनिल श्रीवास यालाही, त्याच्या आईने खरोखरच महापाप केले आहे, असे वाटते. ‘आईच्या हातून पाप घडले आहे आणि जात पंचायतने फक्त धर्म व परंपरेचे पालन केले आहे,’ असे तो म्हणाला. ‘याबाबत अद्याप कुणीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही.अशाप्रकारची घटना घडली असल्याचे आपण मीडियाकडून ऐकलेले आहे’, असे पोलीस अधीक्षक अनिलसिंग कुशवाहा यांनी म्हटले आहे. तर या घटनेकडे लक्ष देणार असल्याचे जिल्हाधिकारी इलयाराजा टी यांनी स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)
सात दिवस भीक मागणे आणि गंगा स्नान करण्याचे फर्मान, जात पंचायतने वृद्धेला ठोठावली वासरू मारल्याची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 2:03 AM