ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 24 - दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने सात फुटीरवादी नेत्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये फुटीवरवादी नेते गिलानी यांच्या जावयाचाही समावेश आहे. या सर्वांवर काश्मीरमधील दहशतवादी संघटनांनी फंडिंग केल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अलताफ शाह, अयाझ अकबर, पीर सैफुल्लाह, मेहराज, शाहिद-उल-इस्लाम, नईम खान आणि बिट्टा यांचा समावेश आहे.
अलताफ शाह, अयाझ अकबर, पीर सैफुल्लाह, शाहिद-उल-इस्लाम, मेहराज आणि नईम खान यांना श्रीनगरमधून अटक करण्यात आली आहे, तर बिट्टा याला दिल्लीमधून अटक करण्यात आली. श्रीनगरमध्ये ज्यांना अटक करण्यात आली त्यांना चौकशीसाठी दिल्लीला आणण्यात येणार आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्याच महिन्यात अलताफ शाह यांच्या घरावर धाड टाकली होती. यावेळी शाहिद-उल-इस्लाम यांच्याही परिसरात झडती घेण्यात आली होती. शाहिद-उल-इस्लाम हा हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मिरवेज उमर फारुख यांचा साथीदार आहे.
अलताफ शाह गिलानी यांचा जावई असून तेहरिक-ए-हुर्रियतसाठीही तो काम करतो. धोरणं विकसित करुन त्यांची अंमलबजावणी करण्यामध्ये त्याचा महत्वाचा सहभाग असतो. फुटीवरवादी संघटनांना मिळणारा निधी खो-यात विध्वंसक गोष्टी आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असून त्यावर पुर्णपणे बंदी आणण्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा प्रयत्न आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेला काही अकाऊंट बुक्स सापडले आहेत. तसंच दोन कोटींची रोख रक्कम, बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांचे लेटर-हेड्सही सापडले आहेत. लष्कर-ए-तोयबा आणि हिजबूल मुजाहिद्दीनचे लेटर-हेड्स त्यामध्ये आहेत.
2002 रोजी आयकर विभागाने काही गिलानी यांच्यासह काही फुटीरवादी नेत्यांवर कारवाई करत छापे टाकले होते. यावेळी काही रोख रक्कम आणि कागदपत्रं जप्त करण्यात आले होते. मात्र कोणताही गुन्हा त्यावेळी दाखल करण्यात आला नव्हता.
इंडिया टुडेच्या स्टिंगमध्ये एक फुटीरतावादी नेत्यानं पाकिस्तान हवालामार्फत कोटी रुपयांचा निधी देत असल्याचं कबूल केलं होतं. दुबई आणि सौदी अरेबियातून काश्मीरमध्ये कशा प्रकारे पैसा पाठवला जातो, याचीही माहितीही या स्टिंगमध्ये फुटीरतावादी नेत्यानं दिली होती. फुटीरतावादी नेत्याशी इंडिया टुडेच्या रिपोर्टरनं निधी देणा-या व्यक्तीच्या स्वरूपात बोलणी केली होती. रिपोर्टरशी बोलण्यासाठी दिल्लीत आलेल्या सय्यद शाह अळी गिलानीच्या हुर्रियत कॉन्फ्रेन्सचे नेते नईम खान यांनी अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या होत्या. रिपोर्टरनं काश्मीरमध्ये सरळ पैसा आणला जात असल्याचं विचारल्यानंतर नईम खान म्हणाला, काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्यानं निधीचं सर्व काम दिल्लीतून होत असतात.
तसेच भारत-पाक सीमेच्या रस्त्याद्वारे छोट्या स्वरूपातही निधी प्राप्त होतो. मात्र सर्व मोठा निधी हा दिल्लीतूनच येत असल्याचा खुलासा त्यानं केला होता. रिपोर्टरनं फंडिंग हवालामार्फत होत असल्याचं विचारल्यानंतर नईम खान म्हणाला, सर्व काम दिल्लीतील बल्लीमारन आणि चांदनी चौकातून होते. अशा प्रकार भारतात हवाल्याचा काम होतं आणि आम्ही त्याचा एक भाग आहोत. गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तान काश्मीरमधील दगडफेक करणा-या तरुणांना कॅशलेस फंडिंग देत असल्याचंही स्टिंगमधूनच समोर आलं होतं. पाकव्याप्त काश्मीरमधून अनेक ट्रक मुजफ्फराबादच्या श्रीनगरमध्ये येत-जात असतात. या ट्रकमधूनच पैसा पाठवला जात असल्याचंही नईम खान यांनी सांगितलं होतं. फुटीरतावादी नेत्यांच्या समर्थनाशिवाय काश्मीरमध्ये शाळेत तोडफोड, जाळपोळ होत नसल्याचेही धक्कादायक खुलासे केले होते.