ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर शोध मोहिम थांबलेली नव्हती फक्त रात्रीच्यावेळी कारवाईचा वेग कमी केला होता. अजूनही कारवाई सुरु आहे. कारवाई आता महत्वाच्या टप्प्यावर असून नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याची नेमकी माहिती कारवाई संपल्यानंतरच मिळेल अशी माहिती एअर मार्शल अनिल खोसला यांनी दिली.
पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यासंदर्भात केंद्रीय गृहसचिव राजीव मेहर्षी यांनी संध्याकाळी पत्रकारपरिषद घेऊन माहिती दिली. टेहळणी आणि गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या सर्तकतेच्या इशा-यामुळे अतिरेक्यांना त्यांचे नियोजित लक्ष्य असलेल्या हवाई दलाच्या टेक्निकल भागापर्यंत पोहोचता आले नाही.
हवाई टेहळणीमुळे दोन जानेवारीच्या पहाटेच अतिरेक्यांच्या हालचालींची माहिती मिळली आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरु करण्यात आली असे राजीव मेहर्षी यांनी सांगितले.
दोन दिवसाच्या कारवाई दरम्यान एनएसजीच्या एका कमांडोसह एअरफोर्सचे सहा जवान असे एकूण सात जवान शहीद झाले. एनएसजीचे १२ कमांडो आणि एअर फोर्सचे आठ जवान जखमी झाले अशी माहिती मेहर्षी यांनी दिली.
रात्री गोळीबार थांबल्यामुळे सर्व अतिरेक्यांचा खातमा झाला किंवा नाही याबद्दल आम्ही ठाम नव्हतो. सकाळी शोधमोहिम सुरु केली तेव्हा आणखी दोन दहशतवादी सापडले असे मेहर्षी यांनी सांगितले.