श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनाग आणि शोपियनमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात 11 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर दोन जवान शहीद झाले आहेत. एका दहशतवाद्याला जिवंत पकडलं असून, तो हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याचं बोललं जातंय. अनंतनागमधल्या दरगाडमध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं होतं. तर दुस-याला जिवंत पकडण्यात आलं आहे. खात्मा करण्यात आलेला दहशतवादी स्थानिक असून, त्याला शरण येण्यास सांगूनही तो शरण आला नाही, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी दिली आहे. तत्पूर्वी अनंतनाग आणि शोपियानमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळताच त्यांनी आजूबाजूच्या परिसराला घेराव घातला. सीआरपीएफ आणि काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीमही राबवली. त्यानंतर सर्व बाजूनं घेरलं गेल्याचं लक्षात येताच दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरुवात केली. त्याच्या प्रत्युत्तरादाखल सीआरपीएफ जवानांनीही गोळीबार केला. या गोळीबारात 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सीआरपीएफ जवानांना यश आलं. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता. तो ताब्यात घेण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमधल्या दोन चकमकीत 11 दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान, दोन जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2018 11:49 AM