- सुधीर जैनजगदलपूर : नक्षली शहीद सप्ताहाच्या एक दिवस आधी छत्तीसगढमधील जगदलपूर जिल्ह्णात शनिवारी सायंकाळी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात भीषण चकमक झडली. यात सात गणवेशधारी नक्षलवादी मारले गेले. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.बस्तरचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले की, नक्षली शहीद सप्ताहात मोठ्या कारवाईच्या तयारीसाठी नक्षलवादी ओडिशा सीमेवरील तिरिया गावाच्या जंगलात गोळा झाले आहेत. ही माहिती मिळताच नगरनार पोलीस ठाण्यातून एसटीएफ, डीआरजी आणि डीएफ यांचे एक संयुक्त पथक शोध मोहिमेवर रवाना झाले. पोलिसांची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनी तोडीस तोड उत्तर दिले. सुमारे तासभर चाललेल्या चकमकीनंतर नक्षलवादी जंगल आणि पहाडाचा आडोसा घेऊन पसार झाले.घटनास्थळावर सात मृतदेह सापडले आहेत, तसेच रक्ताचे डाग व ओढल्याच्या खुणा पाहता आणखी ५ ते ६ नक्षलवादी मारले गेले असावेत, अथवा जखमी झाले असावेत, असे दिसते. हे मृतदेह नक्षलवादी सोबत घेऊन गेले असावेत.हाती आलेल्या मृतदेहांची ओळख पटविली जात आहे. घटनास्थळी इन्सास रायफल, ३0३ रायफल, १२ बोअरची भरमार बंदूक, बॅनर, पोस्टर, औषधी, स्फोटके, डिटोनेटर, विजेच्या तारा, बॅटरी आणि दैनंदिन उपयोगाची सामग्री मिळाली आहे.
छत्तीसगढमधील चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे, स्फोटकांचा मोठा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 1:01 AM