हैदराबाद : मोतीबिंदूच्या आॅपरेशननंतर ७ रुग्णांची दृष्टी गेल्याप्रकरणी सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुमायू नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. रविंदर यांनी सांगितले की, याबाबत तक्रार आल्यानंतर आणि खातरजमा केल्यानंतर सरोजिनी देवी नेत्र चिकित्सालयातील काही डॉक्टरांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्थात यात कुठल्याही डॉक्टरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. हे प्रकरण तेलंगणा मेडिकल बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. गत आठवड्यात येथे काही रुग्णांची डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर १३ रुग्णांना त्रास जाणवू लागला. सात जणांची दृष्टीच गेली. मात्र आपल्याकडून कोणताही बेजबाबदारपणा झाला नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णांना देण्यात आलेल्या सलाईनमधून इनफेक्शन झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना हा त्रास झाला ते सर्व रुग्ण ६० ते ७० या वयोगटातील आहेत. तेलंगणा सरकारने स्पष्ट केले आहे की, या रुग्णांना आवश्यक त्या सुविधा, उपचार पुरविले जातील. तर घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. (वृत्तसंस्था)
शस्त्रक्रियेनंतर सात रुग्णांना अंधत्व
By admin | Published: July 08, 2016 1:19 AM