बीरभूम : पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्याच्या हत्येनंतर मंगळवारी हिंसाचार उसळला. या ठिकाणी जमावाने 5 घरांचे दरवाजे बंद करून आग लावली. या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. ही घटना बीरभूममधील रामपूरहाटमधील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामपुरहाटमध्ये तृणमूल काँग्रेसच्या उपाध्यक्षाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथील जमावाने 5 घरांचे दरवाजे बंद करून आग लावली. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. एवढेच नाही तर डीएमसह बीरभूमचे सर्व अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तृणमूल काँग्रेस पंचायत नेते भादू शेख यांची सोमवारी बीरभूमच्या रामपुरहाटमध्ये हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री त्याच्यावर बॉम्ब फेकण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भादू शेख हे राज्य महामार्ग 50 वरून जात होते. त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर बॉम्ब हल्ला केला. त्यानंतर त्यांना रामपूरहाट येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आठवडाभरापूर्वी दोन नगरसेवकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.