फेंगल चक्रीवादळामुळेतामिळनाडूतील अनेक भागात हाहाकार उडला आहे. अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला असून, पावसामुळे तिरुवन्नामलाईमध्ये भूस्खलनाची घटना घडली आहे. भूस्खलन होऊन एकाच कुटुंबातील ७ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. तीन घरे चिखलाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच तिरुवन्नामलाईचे जिल्हाधिकारी भास्कर पांडियन आणि स्थानिक मदत पथक घटनास्थळी आले. त्यानंतर एनडीआरएफच्या ३० जवानांचे पथक भूस्खलन झालेल्या ठिकाणी आले. हायड्रॉलिक लिफ्ट आणि दोन श्वानांच्या साहाय्याने ढिगाऱ्या खाली दबल्या गेलेल्या लोकांचा शोध सुरू करण्यात आला.
फेंगल चक्रीवादळ शनिवारी सायंकाळी किनारपट्टीवर धडकले होते. वादळाने जमिनीला स्पर्श केला तेव्हा वाऱ्याचा वेग प्रति तास ७०-८० किमी इतका होता. त्यानंतर वेग वाढून ९० किमी पर्यंत गेला. त्यामुळे तामिळनाडू, पद्दुचेरीतील अनेक भागात अतिमुसळधार पाऊस झाला.
सार्वजिनक वाहतूक विस्कळीत झाली, तर अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या काळात शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मदत व बचाव कार्यासाठी लष्कराचीही मदत घेण्यात आली. पद्दुचेरीत तब्बल ६०० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि मदत करण्यात आली.