दमोह - मध्य प्रदेशातील दमोह इथल्या मिशन हॉस्पिटलमध्ये हार्ट सर्जरी झालेल्या ७ जणांच्या मृत्यूनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम के जैन यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर डॉ. एन जॉन केम यांच्याविरोधात FIR नोंदवली. मिशन हॉस्पिटलमध्ये मागील काळात झालेल्या काही रुग्णांच्या मृत्यूला केम यांना जबाबदार धरले आहे. या घटनेची जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या तपास समितीने चौकशी केली तेव्हा डॉ. केम यांचे कागदपत्रे बनावट असल्याचं उघड झालं.
नियमांनुसार, मध्य प्रदेशात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना आरोग्य विभागात रजिस्ट्रेशन करावे लागते परंतु डॉ. केम यांची कुठलीही नोंदणी नव्हती. त्यांच्याकडून जी कागदपत्रे मिळाली त्यात त्यांनी आंध्र प्रदेशात रजिस्ट्रेशन केल्याचा दावा केला परंतु आंध्र प्रदेश मेडिकल बोर्डानेही त्यांच्या नोंदणीबाबत कुठलेही कागदपत्रे नसल्याचं सांगितले. त्यामुळे डॉ. केम हे बोगसपणे काम करत होते. या काळात त्यांनी हार्ट ऑपरेशन केलीत. एका रुग्णाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
कोण आहे डॉ. केम?
परदेशी व्यक्तीसारखे नाव दाखवणारे नरेंद्र विक्रमादित्य यादव स्वत:ला डॉ. एनजोन केम असल्याचं सांगत होते. त्याशिवाय लंडनमधील प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट असल्याचा दावा त्यांनी केला. मागील काही काळापासून ते मध्य प्रदेशातील दमोह येथील मिशन हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. विक्रमादित्यने ज्या ७ जणांवर ऑपरेशन केले त्यांचे मृत्यू झालेत. केमची डिग्री बनावट आहे. दमोह आधी छत्तीसगडच्या बिलासपूर येथेही त्यांनी कार्डियोलॉजिस्ट बनून काही लोकांचे ऑपरेशन केले होते. त्यातही अनेकांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. त्यातीलच एक छत्तीसगड विधानसभेचे माजी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद शुक्ल यांचाही समावेश आहे.
प्रकार कसा उघड झाला?
दमोह इथल्या दीपक तिवारी नावाच्या व्यक्तीने शहरातील मिशन हॉस्पिटलवर आरोप केले. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात या हॉस्पिटलच्या रुग्णांवर चुकीच्या व्यक्तीने उपचार केले त्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमधील एक डॉक्टर स्वत:ला लंडनचा प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट असल्याचं सांगत डॉ केम यांच्यावर आरोप केले. या हॉस्पिटलमध्ये २ महिन्यात १५ जणांवर सर्जरी करण्यात आली त्यातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. हे आरोप होताच तात्काळ या प्रकरणाची तपासणी करण्यात आली त्यात केम यांची कागदपत्रे खोटी असल्याचं समोर आले.