रांची : झारखंडमधील पश्चिम सिंघभूम जिल्ह्यातील एका गावातल्या सात जणांची पत्थलगडी आंदोलकांच्या समर्थकांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, तसेच कु-हाडीने वार करून मंगळवारी हत्या केली. या सात जणांनी पत्थलगडी आंदोलनाला विरोध केल्यामुळेच त्यांना ठार मारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.झारखंडचे पोलीस महानिरीक्षक साकेतकुमार सिंह म्हणाले, बुरुगुलिकेरा गावात घडलेल्या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस मंगळवारी रात्री तिथे चौकशीसाठी गेले.आंदोलनाला विरोध करणाºया सात गावकऱ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचे मृतदेह हल्लेखोरांनी जंगलात टाकून दिले होते. मृतांमध्ये ग्रामपंचायतीचा एक सदस्यही आहे. जंगलात रात्रभर शोध घेतल्यानंतर सातही जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.पत्थलगडी आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबत बुरुगुलिकेरा गावामध्ये मंगळवारी एक बैठक झाली. त्यावेळी या आंदोलनाला काही जणांनी विरोध केल्यामुळे वाद निर्माण झाला. त्याचेच पर्यावसन या हत्याकांडात झाले, असे पश्चिम सिंघभूम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक इंद्रजित महाता म्हणाले.या हत्याकांडाबद्दल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. कायदा हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ असून हत्याकांड घडविणाºयांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटलेआहे. (वृत्तसंस्था)काय आहे आंदोलन?ग्रामसभांना स्वायत्तता द्या, या मागणीसाठी झारखंडमधील आदिवासी समाजाकडून पत्थलगडी आंदोलन सुरू आहे. आदिवासीबहुल भागामध्ये सरकारी कायद्यांचा अंमल नको, अशी या आंदोलकांची मागणी असून, ते जंगल, नद्यांवरील सरकारचा हक्क मान्य करीत नाहीत.आंदोलनाचे प्रतीक म्हणून हे आदिवासी आपल्या गावाबाहेर शिलालेख किंवा फलक उभारतात. हे गाव स्वायत्त भूमी असून, येथे बाहेरच्या लोकांना येण्यास मनाई आहे, असे त्या फलकावर लिहिलेले असते. सरकारी अधिकारी, पोलिसांनाही या गावांत प्रवेश करण्यास पत्थलगडी आंदोलकांकडून मज्जाव केला जातो.१९ जून रोजी एका स्वयंसेवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांचे अपहरण करून त्यांच्यावर पत्थलगडी आंदोलकांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली होती.भाजपचे माजी खासदार करिया मुंडा यांच्या तीन सुरक्षारक्षकांचे या आंदोलकांनी २६ जून रोजी अपहरण केले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. झारखंडमधील कुंती, गुमला, सिमदेहा, पश्चिम सिंघभूम या नक्षलवादग्रस्त चार जिल्ह्यांत पत्थलगडी आंदोलनाने जोर धरला आहे.
झारखंडमध्ये सात गावकऱ्यांची निर्घृण हत्या, पत्थलगडी आंदोलकांचे अमानुष कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 5:04 AM