हरियाणातील हिसारमधील हांसी शहरातील सुभाष नगरमध्ये पिटबुल जातीच्या कुत्र्याने सात वर्षांच्या मुलावर हल्ला केला. कुत्रा मुलाच्या ओठांना चावला होता. तसेच कमरेवर व चेहऱ्यावर पंजा मारून जखमी केलं. मोठ्या कष्टाने पिटबुलच्या मालकाने मुलाला वाचवलं. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी गोंधळ घातला. मुलाला उपचारासाठी हिस्सार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, शनिवारी मुलावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.
याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पिटबुलच्या मालक सविता यांनी सांगितलं की, तिने दोन पिटबुल घरात ठेवले आहेत आणि दोन्ही पिटबुलची नगरपरिषदेकडे नोंदणी केली आहे. पिटबुल्सलाही दर सहा महिन्यांनी लस दिली जाते. घटनेच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य घरात होतो. गेट उघडं असल्याने पिटबुल रस्त्यावर गेला आणि रस्त्यावरून क्लासला जाणाऱ्या सात वर्षांच्या मुलावर हल्ला केला.
शेजारच्या एका महिलेने हा प्रकार कळताच याबाबतची माहिती मुलाच्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीय तेथे आले असता त्यांना अक्षत रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. पिटबुलचे मालक राजेश चोप्राची पत्नी सविता यांनी सांगितले की, गेल्या 9 वर्षांपासून पिटबुलला घरात ठेवत होते. असा प्रकार यापूर्वी कधीच घडला नव्हता. घटनेनंतर दोन्ही पिटबुल शहराबाहेरील श्वान फार्ममध्ये सोडण्यात आले.
अक्षतची आजी प्रेमलता यांनी सांगितले की, त्यांचा नातू अक्षत हा शहरातील कालीदेवी शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकतो. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता तो क्लासला जात होता. घरातून बाहेर पडताच शेजारच्या घराबाहेर दोन पिटबुल बसले होते. कुत्र्यांनी लगेच अक्षतवर हल्ला केला. मुलाच्या ओठावर शनिवारी हिसार येथील खासगी रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.