७,१३६ कोटींचा घोटाळा; १३ कोटींचा दंड!
हैदराबाद : पूर्वी सत्यम् कॉम्प्युटर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कंपनीत लेखापुस्तके लिहिताना आणि त्यांचे लेखापरीक्षण करताना बनावटगिरी करून केल्या गेलेल्या ७,१३६ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात येथील विशेष न्यायालयाने गुरुवारी या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष बी. रामलिंग राजू यांच्यासह एकूण १० आरोपींना प्रत्येकी ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि एकूण १३ कोटी रुपयांची शिक्षा ठोठावली. अशा प्रकारे भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील या सर्वांत मोठ्या लबाडीची सहा वर्षांनी जणू केवळ चापटी मारून सांगता झाली. कारण रक्कम कितीही मोठी असली तरी कायद्यात अशा गुन्ह्यासाठी एवढीच शिक्षा देण्याची तरतूद आहे!सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बीव्हीएलएन चक्रवर्ती यांनी रामलिंग राजू व त्यांचे वडीलबंधू आणि सत्यम्चे त्या वेळचे व्यवस्थापकीय संचालक रामा राजू यांना सात वर्षांच्या कारावासाखेरीज प्रत्येकी साडे पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला. याखेरीज इतर आठ आरोपींना तेवढ्याच कारावासाच्या शिक्षेसोबत प्रत्येकी २५ लाख रुपयांचा दंड झाला. शिक्षा जाहीर होताच जामिनावर असलेल्या सर्व आरोपींना पुन्हा ताब्यात घेण्यात आले. शिक्षा तीन वर्षांहून जास्त असल्याने त्यांना आता जामिनासाठी सत्र न्यायालयात जावे लागेल. या सर्व आरोपींना भादंविच्या १२०बी, ४२०, ४०९, ४६७, ४६८, ४७१, ४७७-ए आणि २०१ या कलमांन्वये दोषी धरले गेले. बनावट पद्धतीने खातेपुस्तके लिहून कंपनी उत्तम वित्तीय स्थितीत असल्याचे चित्र निर्माण करून एकीकडे गुंतवणूकदारांची फसवणूक करणे व दुसरीकडे स्वत:ची तुंबडी भरून घेणे असे त्यांच्यावर आरोप होते.स्वत: बी. रामलिंग राजू यांनीच ७ जानेवारी २००९ रोजी सत्यम्च्या कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून कंपनीत कित्येक वर्षे चाललेल्या या घोटाळ्याची कबुली दिली होती. त्यानंतर सरकारने आयोजित केलेल्या लिलावात सत्यम् टेक महिंद्र कंपनीने घेतली व त्यानंतर ही कंपनी या नव्या नावाने सुरू आहे. आजच्या या निकालाने या घोटाळ्यातील मुख्य फौजदारी खटल्याची सांगता झाली असली तरी याअनुषंगाने इतरांनी दाखल केलेले सुमारे अर्धा डझन फौजदारी खटले व दिवाणी दावे अद्याप प्रलंबित आहेत. शिक्षा झालेले इतर आरोपी असे- सत्यम्चे तत्कालीन मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवास वाडलामणी. कंपनीचे वैधानिक लेखापरीक्षण करणाऱ्या प्राईस वॉटरहाउस या दिग्गज फर्मचे भागीदार एस. गोपालकृष्णन व तालुरी श्रीनिवास, कंपनीचे अंतर्गत हिशेब तपासनीस बी. सूर्यनारायण राजू आणि प्रभाकर गुप्ता, वित्त विभागाचे प्रमुख जी. रामकृष्ण आणि डी. लक्ष्मीपती व व्यंकटपती राजू या इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)