बनासकांठा- गुजरातमधले शेतकरी बटाट्याची चांगली शेती न झाल्यानं त्रासलेले असताना दुस-या एका शेतक-यानं चक्क खरबुजाच्या शेतीतून 70 दिवसांत 21 लाख रुपये कमावले आहेत. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील शेतकरी खेताजी सोळंकीनं बटाट्याच्या जागी खरबुजाची शेती केली आणि त्यात त्याला भरपूर फायदा झाला.शेतक-यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी आधीच चिंतेत होते. त्याचाच विचार करून खेताजी सोळंकी या शेतक-यानं अभिनव प्रयोग करत खरबुजाची लागवड केली. सातवी पास असलेल्या सोळंकीनं गावातील दुस-या शेतक-यांनाही खरबुजाची शेती करण्यासाठी प्रोत्साहित केलं. सोळंकीनं खरबुजाची लागवड करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. चांगल्या प्रतीचं बियाणं, ठिबक सिंचन आणि सोलर वॉटरपंपाचा उपयोग केला. फेब्रुवारीमध्ये लागवड केलेली पिकं एप्रिलमध्ये तयार झाली असून, त्या शेतक-यानं 70 दिवसांत 21 लाख रुपये कमावले आहेत. त्याला शेतातून140 टन खरबुजाचं उत्पन्न मिळालं आहे.या लागवडीसाठी त्यानं 1.21 लाख रुपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे त्याच्या शेतात टरबुजाचं एवढं चांगलं उत्पन्न झालं की व्यापा-यांनी स्वतःहून त्यांच्याकडून खरबुज खरेदी केले. खेताजी हे जास्त शिकलेले नाहीत. परंतु ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. तसेच मोबाइल अॅपच्या माध्यमातून शेतीबाबत माहिती गोळा करतात. ते आता चेरी आणि टोमॅटोची लागवड करू इच्छितात.
सातवी पास शेतकऱ्यानं दोन महिन्यात कमावले 21 लाख रुपये... बघा कशी केली ही किमया!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 3:54 PM