रविवारी जयपूरच्या दोन मोठ्या रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शहरातील सीके बिर्ला (CK Birla) आणि मोनिलेक रुग्णालयामध्ये (Monilek Hospital) ही बॉम्बची धमकी मिळाली आहे. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. तसेच, रूग्णांना रुग्णालयांतून बाहेर काढून तपासणी केली जात आहे.
जयपूरमधील सीके बिर्ला आणि मोनिलेक ही दोन्ही मोठी रुग्णालये आहेत. बॉम्बची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे. दोन्ही रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही रुग्णालये रिकामी करण्यात आली असून बॉम्बचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, यासंबंधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये पोलिसांच्या गाड्यांव्यतिरिक्त, रुग्णालयामध्ये अग्निशमन दल देखील दिसत आहे. अग्निशमन दल आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून देशातील विविध राज्यांतून बॉम्बच्या अफवा पसरत आहेत. सर्वात आधी दिल्ली आणि एनसीआरमधील अनेक मोठ्या शाळांमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आली. यानंतर मुंबईतील बेस्टच्या बसेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना पाठवण्यात आली होती. अशा अफवा पसरवणे ही काही नवीन गोष्ट नाही, मात्र अलीकडच्या काळात असे प्रकार वाढले आहेत. दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या राज्यात असे हॉक्स कॉल येतात.
नवी मुंबईतील इनॉर्बिट मॉल उडवण्याची धमकीनवी मुंबई येथील वाशीतील इनॉर्बिट मॉल बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल मॉल प्रशासनाला शनिवारी सकाळी आला. यामुळे बॉम्बशोधक व निकामी पथकासह पोलिस, अग्निशमन दल व इतर आपत्कालीन यंत्रणांनी त्याठिकाणी धाव घेतली. यादरम्यान संपूर्ण मॉल रिकामा करून प्रत्येक कानाकोपऱ्याची झाडाझडती घेण्यात आली. दरम्यान, बॉम्बचा हा ई-मेल राज्यभरातील व राज्याबाहेरील इनॉर्बिटच्या २३ शाखांना केला असल्याचे समोर आले आहे. इनॉर्बिट व्यवस्थापनाला मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल येताच त्यांनी वाशी पोलिसांना यासंबंधी माहिती दिली.