अमरावती: आंध्र प्रदेशात गोदीवरीत बोटीत उलटल्यानं 11 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 23 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या बोटीतून 61 जण प्रवास करत होते. सध्या एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय बचाव कार्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गोदावरी नदीला सध्या पूर आला आहे. सध्या घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याची माहिती एसपी अदनान अन्सारी यांनी दिली. आंध्र प्रदेश पर्यटन विकास मंडळाच्या बोटीत 61 जण होते. यामध्ये चालकासह 11 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुच्चुलरु भागात बोट उलटली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक गौतम सवांग आणि मुख्य सचिव एल. व्ही. सुब्रमण्यम यांना बचाव कार्यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. पर्यटकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची अतिरिक्त पथकं तैनात करण्याचे आदेशदेखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस प्रमुखांनी भारतीय नौदलाकडे मदत मागितली. नौदलानं 1 हेलिकॉप्टर पाठवून बचाव कार्यात सहकार्य करावं, असं आवाहन नौदलाकडे केलं. तर राज्याचे मुख्य सचिव एल. व्ही. सुब्रमण्यम यांनी गोदावरीचे जिल्हाधिकारी मुरलीधर रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना घटनेबद्दलची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.