भाजपाचे आमदार आणि बेळगाव परिसरातील नेते माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज राज्य सरकारकडे सेक्स सीडी स्कँडल प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी खास पत्रकार परिषद घेतली. याद्वारे त्यांनी कर्नाटकातील काँग्रेसचे चाणक्य डी के शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सेक्स सीडी कांडामध्ये राज्यातील शेकडो नेते, बेंगळुरुतील बडे बडे अधिकारी अडकले आहेत. माझ्याकडे १२० जणांचे पुरावे आहेत. या प्रकरणात महिलेसह माजी पत्रकार नरेश आणि सहा लोकांना अटक करण्यात यावी, असा गौप्यस्फोट जारकीहोळी यांनी केला आहे.
शिवकुमार यांनी राजकीय दृष्ट्या संपविण्यासाठी कट रचला होता आणि माझा व्हिडीओ बनविला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. मी गेली दीड वर्ष वाट पाहत आहे, शिवकुमार यांनी सीडी बाहेर काढून माझे आयुष्य बरबाद केलेय. कोणतीही चूक केली नाही, तरीही भोगावे लागत आहे. मी माझ्याकडील पुरावे सीबीआयला देईन. १९८५ मध्ये हेच शिवकुमार आणि मी राजकारणात आलेलो. मी रॅडोचे घड्याळ घालायचो, तर शिवकुमार माझ्याकडे फाटक्या चपलाने आलेले. आता त्यांच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता आहे, असा आरोप जारकीहोळी यांनी केला आहे.
जारकीहोळी यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांची चौकशी करणार्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणात बी अहवाल दाखल केला होता. यामध्ये आरोप किंवा इतर आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत, असे म्हटले होते. यामुळे जारकीहोळी पुन्हा मंत्रिपदासाठी प्रय़त्न करत आहेत. परंतू, निवडणुकीमुळे भाजपा रिस्क घेण्याच्या तयारीत नाहीय.