प्रेमातून झालेले शारीरिक संबंध बलात्कार नाही- हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 10:07 AM2018-04-02T10:07:37+5:302018-04-02T10:07:37+5:30
महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवल्याने कुठल्याही पुरूषाला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवता येणार नाही.
पणजी- महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवल्याने कुठल्याही पुरूषाला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवता येणार नाही, असं मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने एका प्रकरणाचा निकाल देताना म्हटलं आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध असतील आणि त्यातून शारीरिक संबंध ठेवले असतील तर पुरूषाला बलात्काराचा आरोपी मानता येणार नसल्याचं कोर्टाने निर्णय देताना स्पष्ट केलं.
योगेश पालेकर या व्यक्तीच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने हा निकाल दिला आहे. योगेश पालेकरवर महिलेने लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याचा आरोप ठेवला होता. या प्रकरणी कोर्टाने त्याला 7 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रूपये दंडांची शिक्षा दिली होती. 2013 मधील या प्रकरणाचा निकाल देताना कोर्टाने आरोपीची शिक्षा आणि दंड रद्द केला. योगेश गोव्यातील एका कॅसिनोमध्ये शेफ म्हणून काम करत होता. त्याच कॅसिनोमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते.
कुटुंबीयांना भेटण्याच्या बहाण्याने योगेश घरी घेऊन गेला होता. त्या दिवशी तेथे रात्री थांबले आणि आमच्या दोघांमध्ये शारीरिक संबंध बनले. दुसऱ्या दिवशी योगेशने घरी सोडलं. योगेशने त्या दिवशीनंतर तीन-चार वेळा शारीरिक संबंध बनवले होते, असं त्या महिलेने सांगितलं. यानंतर महिलेने योगेशच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली.
संबंधित महिला योगेश पालेकरला आर्थिक मदतही करत होती, असं कोर्टाला सुनावणीच्या वेळी समजलं. योगेशने वचन दिलं म्हणूनच दोघांमध्ये शारीरिक संबंध बनले नाहीत तर दोघांमध्ये सहमती होती. म्हणूनच या प्रकरणाला बलात्कार म्हणता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.