नवी दिल्ली - अयोध्येत रामजन्मभूमी विवादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत फेरविचार याचिका दाखल करणे मुस्लिमांच्या हिताचे नाही. या कृतीमुळे हिंदू-मुस्लिम ऐक्यावर परिणाम होऊ शकतो, असे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष घायोरूल हसन रिझवी यांनी रविवारी म्हटले होते. अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील सुमारे १०० मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नामवंत व्यक्तींनी अयोध्या निकालाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्याला विरोध दर्शवला आहे. हा वाद कायम राहिल्यास मुस्लीम समाजाचे नुकसान होऊ शकते असे या सर्वांना वाटते. पुनर्विचार याचिकेला विरोध करण्याबाबतच्या निवेदनावर ज्येष्ठ, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार, उद्योजक, कवी, कलाकार, चित्रपट निर्माते आणि नाट्यकालावंतांच्या सह्या आहेत.
आपल्या संयुक्त निवेदनात असे म्हटले आहे की, या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे मुस्लिमांना फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसान होईल. या निवेदनावर अभिनेता नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी, पत्रकार जावेद अहमद, हैदराबादचे सामाजिक कार्यकर्ते आरिझ अहमद, चेन्नईचे वकील ए.जे. जावद आणि मुंबईचे लेखक अंजुम राजाबाली यांच्यासारख्या नामांकित व्यक्तींनी सह्या केल्या आहेत. या सर्वांच्या मते, भारतीय मुस्लिम समुदाय, घटनात्मक तज्ज्ञ आणि धर्मनिरपेक्ष संस्था या निर्णयाची सुनावणी घेताना कायद्याच्या ऐवजी विश्वासाची बाजू मांडल्याबद्दल नाराज आहेत. मात्र, हा मुद्दा जिवंत ठेवल्यास मुस्लिम समुदायाला त्रास सहन करावा लागेल.