नवी दिल्ली : केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याची तयारी केरळ सरकारने दर्शवली आहे. सरकारतर्फे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली. शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीबाबत सुनावणी झाली, तेव्हा सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश दिला जावा, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र येथील केरळ सरकारने दाखल केले.मंदिर प्रवेशाबाबत स्त्री व पुरुष असा फरक असू नये, अशी भूमिका केरळमधील डाव्या आघाडीच्या सरकारने घेतली. यापूर्वी काँग्रेसच्या सरकारने शबरीमाला देवस्थानाच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाखालील आघाडी केरळमध्ये सत्तेत आल्यावर या भूमिकेत बदल करण्यात आला. शबरीमाला मंदिरात १0 वर्षांपासून ५0 वर्षांपर्यंतच्या महिलांना प्रवेशास बंदी आहे. मासिक पाळी येणाऱ्या महिलांना प्रवेश नाही, अशीच ही भूमिका होती. नंतर मात्र मासिक पाळीच्या काळात मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश न देण्याची भूमिका मंदिर व्यवस्थापनाने घेतली. एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू आहे का, हे कळावे, यासाठी तिथे यंत्र बसवण्याचा विचारही व्यवस्थापनाने चालविला होता आणि तसे न्यायालयात सांगितले होते.मात्र, मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत महिलांना जाण्याची परवानगी असायला हवी असे केरळ सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यावेळी सरकारच्या नव्या प्रतिज्ञापत्राबाबत शबरीमाला देवस्थान व्यवस्थापनाची भूमिका सर्वोच्च न्यायालयात समजून घेईल. केरळमधील यंग लॉयर्स असोसिएशन या संघटनेने २00६ साली शबरीमाला मंदिरात महिलांना असलेल्या प्रवेशबंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती.
शबरीमाला मंदिरात महिलांनाही प्रवेश?
By admin | Published: November 08, 2016 3:17 AM