तिरुवनंतपुरम : शबरीमाला डोंगरावरील प्रसिद्ध आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश खुला करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या निषेधार्थ गुरुवारी विविध हिंदू संघटनांनी केरळमध्ये बंद पाळला. त्यामुळे राज्यात बस, रिक्षा सेवा ठप्प झाली होती तर काही ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक झाल्याचेही प्रकार घडले.
आयप्पा मंदिरामध्ये जाऊ पाहणाऱ्या न्यूयॉर्क टाइम्सच्या भारतातील प्रतिनिधी सुहासिनी राज व त्यांची एक विदेशी पत्रकार सहकारी यांना संतप्त निदर्शकांनी पाम्बा येथे वाटेतच रोखले. त्यामुळे या दोघींना नाईलाजाने परत फिरावे लागले. आम्ही मंदिरामध्ये नव्हे तर वृत्तसंकलनाच्या कामासाठी इथे आलो आहोत, असे सुहासिनी राज यांनी निदर्शकांना सांगितले. पण कोणीही त्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
शबरीमालाकडे जाणाºया निलक्कल आदी मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. निदर्शने, हिंसाचार यासारख्या घटना टाळण्यासाठी सन्निधनम, पाम्बा यासह चार ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली होती. निलक्कल येथे बुधवारी आयप्पा भक्तांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ शबरीमाला संरक्षक समितीने पुकारलेल्या बंदला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया, भाजप व एनडीएतील घटक पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता. या बंदमध्ये काँग्रेस सहभागी झाली नव्हती.