नवी दिल्ली : केरळच्या शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास अनुमती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे महिला हक्क कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. मात्र, हा निकाल सर्वसामान्य लोक मनापासून स्वीकारतील का, याविषयी शंकाही उपस्थित केली आहे.महिला हक्क कार्यकर्त्या छावी मेथी यांनी म्हटले आहे की, हा निकाल तर उत्तम आहे; पण सर्वसामान्य लोकांना तो कितपत पटेल याविषयी शंका वाटते. महिला या निकालाचे नक्कीच स्वागत करतील; परंतु त्याची अंमलबजावणी करताना काही प्रश्न निर्माण होऊ शकतात.वाणी सुब्रमण्यम यांनी सांगितले की, समान न्याय प्रस्थापित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याआधी जे निर्णय दिले त्यातील पुढचे पाऊल म्हणजे शबरीमाला मंदिर प्रवेशासंदर्भातील निकाल आहे; मात्र त्यावर समाजाची नेमकी प्रतिक्रिया काय असेल, याचा अंदाज येत नाही. आॅल इंडिया डेमोक्रॅटिक वूमन्स असोसिएशनच्या सरचिटणीस मरियम ढवळे म्हणाल्या की, हा निकाल म्हणजे समानता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने पडलेले एक पाऊल आहे. मंदिरात जाऊन दर्शन घेणे हा महिलांना मिळालेला घटनात्मक अधिकार आहे. त्याच्या आड कोणीही येऊ शकत नाही.हिंदू धर्म समावेशक होईल- मनेका गांधीशबरीमालासंदर्भातील निकालामुळे हिंदू धर्म अधिक समावेशक होईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, या निकालामुळे हिंदू धर्म ही कोणा एका जातीची किंवा कोणा एका लिंगाचीच मक्तेदारी राहणार नाही.सकारात्मक निकाल -संतोष हेगडेपुरुषांच्या तुलनेत महिलांना कायमच दुय्यम वागणूक देण्यात येते. शबरीमाला मंदिरातही तेच सुरू होते. खरेतर देव हा पुरुष व महिला दोघांसाठी सारखाच असतो. केवळ लिंगभेदाच्या मुद्यावरून महिलांना मंदिरप्रवेश नाकारणे हा अन्याय होता व तो शबरीमाला प्रकरणीच्या निकालामुळे दूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक सकारात्मक निकाल दिले आहेत. त्यात या निकालाचाही समावेश केला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश संतोष हेगडे यांनी सांगितले.केरळच्या देवस्थान खात्याने केले निर्णयाचे स्वागतया निकालाचे स्वागत करताना केरळच्या देवस्थान खात्याचे मंत्री कडाकमपल्ली सुरेंद्रन यांनी म्हटले आहे की, शबरीमालाच्या आयप्पा मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून प्रदीर्घ काळ कायदेशीर लढा सुरू होता. त्याचे फलित म्हणजे हा ऐतिहासिक निर्णय आहे.केवळ शबरीमालाच नव्हे, तर सर्व धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश मिळायला हवा, अशी आमची भूमिका आहे. या निकालाची त्रावणकोर देवस्वम मंडळाला अंमलबजावणी करावी लागणार आहे.मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेण्याच्या महिलांच्या हक्काला बाधा येऊ नये यासाठी या मंडळाला यापुढे दक्ष राहावे लागेल. आयप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात यावा असेच केरळ सरकारचे पहिल्यापासून मत होते.निकाल निराशाजनक : शबरीमालाच्या मुख्य पुजाऱ्याचे मतशबरीमालाच्या आयप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया या मंदिराचे मुख्य पुजारी कंदारारू राजीवरू यांनी व्यक्त केली आहे; मात्र या निकालाची देवस्थान अंमलबजावणी करील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्रावणकोर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष ए. पद्मकुमार यांनी सांगितले की, निकालाचा सविस्तर अभ्यास करून त्याप्रमाणे पुढची पावले उचलली जातील.
शबरीमाला : महिला हक्क कार्यकर्त्यांकडून निकालाचे जोरदार स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 5:46 AM