कुंदन पाटीलजळगाव : घरात चिमुकली पणती आली. तेव्हा ‘शहा’गृह तेजाळून निघाले. चिमुकल्या आयुष्याला ‘अरिहा’ नाव वाहिलं. सहा महिन्यांची ही पणती आनंदकणच उधळत होती. नियतीच्या डोळ्यांना मात्र ते खुपत होते. म्हणूनच नियतीने अचानक अंधार पेरायला सुरुवात केली. अचानक अरिहाच्या नाजूकशा जागी जखम झाली. अरिहाला तत्काळ दवाखान्यात दाखल केले. तिथेच जर्मनीसारख्या प्रगत देशाने संवेदनशीलपणाचा आव आणायला सुरुवात केली आणि तिथल्या प्रशासनाने तान्हुल्या पणतीला ताब्यात घेतले. व्यथित शहा दाम्पत्य दहा महिन्यांपासून कायद्याच्या दारातच उभे आहेत... त्यांची परी पुन्हा कुशीत परतावी म्हणून...
मुंबईतील भावेश व धारा (अहमदाबाद) हे दाम्पत्य जर्मनीतील बर्लीन शहरात वास्तव्याला आहेत. फेब्रुवारी २०२१ मध्ये शहांच्या घरी लेक जन्मली. सप्टेंबर २०२१ मध्ये अरिहाने घातलेल्या डायपरवर रक्ताचे डाग दिसले. डायपर बदलताना तिच्या नाजूक जागी जखम झाल्याचे स्पष्ट झाले. धारा आणि भावेशने अरिहाला दवाखान्यात दाखल केले. तिकडे जर्मन कायद्याने अरिहावर शस्त्रक्रिया सुरू केली. पोलिसांपाठोपाठ ‘जर्मन चाईल्ड केअर सेंटर’चे अधिकारीही दाखल झाले. त्यांनी अरिहाला ताब्यात घेतले. तेव्हा शहा दाम्पत्याची कोंडी झाली. अरिहाच्या डीएनएसह सर्वच चाचण्या केल्या. सुदैवाने सारं व्यवस्थित; पण तिथल्या कायद्याने धाराची कुशी पोरकी केली. अरिहाला एका जर्मन कुटुंबीयांच्या शिशुगृहात धाडलं आणि तिला ममत्व साधं स्पर्शही करू शकत नाही, अशी चौकटच उभी केली गेली. व्यथित भावेश आणि धाराने अनेकांपुढे मदतीसाठी हात पसरले. गुजरातच्या जैन समाज संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व धाराचे वडील यांनीही दिल्लीचे दरवाजे ठोठावले हाेते.
मानसिक छळाची मालिका अरिहाचा पासपोर्ट जर्मन प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. अरिहाला मांसाहार देऊ नका, अशा केलेल्या विनंतीची गांभीर्याने दखल घेतली नाही. अरिहाला भारतातील नातलगांकडे सोपवा म्हणून मागणी केली. त्यालाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अरिहावर जर्मन संस्कृती लादण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशाच भावना व्यक्त होत आहेत. अमेरिका आणि नॉर्वेतील अशा घटनांमध्ये यापूर्वी लेकींना भारतीय पालकांकडे स्वाधीन केले.