- नितीन अग्रवालनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्टÑातील खासदारांची बैठक घेऊन केंद्र सरकारच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासोबत संघटना मजबूत करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत खासदारांच्या कामांबाबतही चर्चा करण्यात आली.महाराष्टÑ प्रदेश भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, निवडणुकीची तयारी आणि मतदान केंद्रस्तरापर्यंत संघटना मजबूत करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदी संसदेच्या प्रत्येक अधिवेशनादरम्यान राज्यांतील भाजप खासदारांशी अशा प्रकारे संवाद साधत असतात.तीन राज्यांत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा काहीही परिणाम होणार नाही. शिवसेनेसोबतच्या मतभेदाच्या मुद्यावर या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले. बुथस्तरापर्यंत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज्यांतील प्रत्येक जिल्हा मुख्यालयात पक्ष कार्यालय स्थापन करणे आणि बुथस्तरापर्यंत संघटना मजबूत करण्याचे निर्देश अमित शहा यांनी खासदारांना दिले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.दिल्लीतील महाराष्टÑ सदनात बुधवारी सायंकाळी दोन तास बैठक चालली. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, राज्यमंत्री हंसराज अहिर, अर्जुन राम मेघवाल, भाजपचे संघटन सरचिटणीस रामलाल, उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेचे राज्यातील सर्व खासदार उपस्थित होते. पाच वर्षांत खासदारांनी केलेले काम आणि राज्यांत निवडणुकीदरम्यान उपस्थित केल्या जाणाऱ्या संभाव्य स्थानिक मुद्यांवर अमित शहा यांनी चर्चा केली, असे लोकसभेतील एका खासदाराने सांगितले, तसेच प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्याचे आणि प्रत्येक मतदाराशी संपर्क करून पक्षाला मत देण्यासाठी प्रेरित करण्याचे निर्देश दिले.या बैठकीत नारायण राणे हेही सहभागी होते. भाजपच्या पाठिंब्यावर राणे यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले आहे. त्याआधारे त्यांना बैठकीला बोलाविण्यात आले होते, असे दानवे यांनी सांगितले.
शहा यांनी महाराष्ट्रातील खासदारांना दिला निवडणूक जिंकण्याचा मंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 5:42 PM