कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांची नुकतीच सुखरुप सुटका झाली आहे. यापैकी सात अधिकारी मायदेशी परतले आहेत. भारतात परतल्यानंतर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या माजी अधिकाऱ्यांनी सुटकेचं श्रेय दिले आहे. असे असताना सुब्रमण्यम स्वामी यांनी एका बॉलिवुड अभिनेत्याच्या मध्यस्थीमुळे या नौदल अधिकाऱ्यांची सुटका झाल्याचा दावा केला आहे.
नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेनंतर मोदी, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची सोशल मीडियावरून स्तुती केली जात आहे. यावरून स्वामी यांनी आठ नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा कमी करण्यास व मायदेशी आणण्यास परराष्ट्र मंत्रालय आणि एनएसए अपयशी ठरल्याचा दावा केला आहे. महत्वाचे म्हणजे स्वामी यांनी मोदींच्या ट्विटवर हे ट्विट केले आहे. तर शाहरुख खान नुकताच दोहाला गेला होता, तिथे तो कतारच्या पंतप्रधानांना भेटला होता.
परराष्ट्र मंत्रालय आणि एनएसए अयशस्वी ठरल्यानंतर बॉलिवुडचा बादशाहा शाहरुख खानला मोदींनी मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. यानंतर आपल्या माजी अधिकाऱ्यांना सोडविण्यासाठी खूपच महागडी डील करण्यात आल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे.
''मोदींनी सिनेस्टार शाहरुख खानला सोबत कतारला न्यावे. जेव्हा केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) कतारच्या शेखांना पटवण्यात अयशस्वी ठरले तेव्हा मोदींनी शाहरुख खानला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. आमच्या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी कतारच्या शेखांसोबत खूप महागडा करार करण्यात आला, असे ट्विट स्वामी यांनी केले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.