ऑनलाइन लोकमत
पटना, दि. 26- बिहारचा कुख्यात गुंड आणि बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीनच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 28 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात याबाबत पुढील सुनावणी होईल. जामीन रद्द झाल्यास शहाबुद्दीनला पुन्हा तुरूंगाची हवा खावी लागणार आहे. 7 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने शहाबुद्दीनला ऍसिड हल्ल्याप्रकरणी जामीन मंजूर केला होता.
मागील अकरा वर्षांपासून शहाबुद्दीन तुरुंगामध्ये कैद होता. शहाबुद्दीनच्या सुटकेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांवर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण आणि बिहार सरकार त्याच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते.
2004 मध्ये चंदाबाबूंच्या दोन मुलांना शहाबुद्दीनने ऍसिड टाकून ठार केले होते. त्यानंतर या घटनेचा साक्षीदार त्यांचा तिसरा मुलगा राजीवचीही दोन वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. राजीवच्या हत्येप्रकरणाचा खटला सुरू झाला नव्हता त्याच आधारावर उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता.