पटियाला : लडाखच्या गलवान खोऱ्यात वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) गेल्या सोमवारी भारत-चीन सैन्यांमध्ये हिंसक चकमक झाली. या चकमकीत पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील रहिवासी असलेले जवान मनदीप सिंग शहीद झाले. 15 दिवसांपूर्वी आपली सुट्टी संपवून मनदीप सिंग हे पुन्हा लष्कराच्या सेवेत रूजू झाले होते. शहीद होण्यापूर्वी होण्यापूर्वी मनदीप सिंग हे शत्रू सैन्याशी मोठ्या धैर्याने लढत होते, असे त्यांच्या टीममधील एका जवानाने सांगितले. हा जवान या चकमकीदरम्यान गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मनदीप सिंग ज्या पोस्टवर शहीद झाले. त्याच पोस्टवरून त्यांचे भाऊ निर्मल सिंग गेल्या 30 एप्रिलला लष्करातून सेवानिवृत्त झाले होते. निर्मल सिंग यांनी भावूक होत आपल्या भावाच्या धैर्याची कहाणी सांगितली. ते म्हणाले की, "मनदीप आपल्या टीमचा लीडर होता. ज्यावेळी चीनकडून हल्ला करण्यात आला, त्यावेळी तो धैर्याने आणि आत्मविश्वासाने पुढे गेला. त्याने दोन चीनचे सैनिक पकडले होते. मात्र, त्याचवेळी चीनच्या तिसऱ्या जवानाने मनदीपवर हल्ला केला. ज्यामुळे तो शहीद झाला."
मनदीपच्या टीममधील एक जवान गंभीर जखमी झाला आहे. तो रुग्णालयात दाखल आहे. त्याने फक्त मनदीपच्या धाडसाबद्दल सांगितल्याचे निर्मल सिंग म्हणाले. तसेच, त्यांनी सांगितले की, "मनदीप शस्त्रू सैन्यावर तुटून पडत होता. त्याने कोणावरही हल्ला केला, तर तो पुन्हा उठला नाही." यावेळी मनदीप सिंग यांच्या शौर्याची कहाणी सांगताना निर्मल सिंग भावूक झाले होते. ते म्हणाले, "बुधवारी सकाळी फोन आला आणि मनदीप जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दुपारी पुन्हा फोन आला आणि सांगण्यात आले की, चिनी सैन्याशी लढताना मनदीप शहीद झाले."
दरम्यान, भारत आणि चीनमध्ये सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे. या घटनेनंतर सीमेवरील तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता लडाख सीमेजवळच नाही तर संपूर्ण सीमेवर जवान सतर्क आहेत.
आणखी बातम्या...
देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती
भारताची चीनला घेरण्याची तयारी, सीमेवर जवान सतर्क, रस्ता बांधणीला वेग
कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"
India China FaceOff : भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला सुनावले, म्हणाले...
India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह
दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव